ताज्या घडामोडीमुंबई

चाळ व्यवहारात ‘सोन्याची कौले’; राऊत यांच्याविरोधातील आरोपपत्रात ठपका

मुंबई | प्रतिनिधी

 पत्राचाळ पुनर्विकासप्रकरणी ईडीची माहिती

राऊत यांच्याविरोधातील आरोपपत्रात ठपका

‘एचडीआयएल’कडून रक्कम गोळा केल्याचा दावा

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या व्यावसायिक प्रवीण राऊत यांनी गैरमार्गाने ११२ कोटी रुपये जमवले, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्रात म्हटले आहे. ‘एचडीआयएल’कडून ही रक्कम मिळाल्याचे ‘ईडी’ने म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘ईडी’ने या प्रकरणात २ फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना अटक केली. ते गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. ही हाऊसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरची (एचडीआयएल) उपकंपनी आहे. या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडासोबत करार केला होता. ही चाळ तब्बल ४७ एकरावर वसली असून, तेथे ६२७ भाडेकरू आहेत. या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावी, असा करार सन २०१०मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर प्रवीण राऊत यांनी एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान व अन्य संचालकांना हाताशी घेत या चाळ पुनर्विकासापोटी मिळणाऱ्या चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) परस्पर अन्य बांधकाम विकासकांना विक्री केली. याद्वारे त्यांनी बेकायदा तब्बल १०७४ कोटी रुपये जमवले. पण त्याचवेळी पत्राचाळीचा मात्र एक इंचदेखील पुनर्विकास केला नाही. त्याखेरीज याआधारे त्यांनी बँकेतूनही ९५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले व त्या रकमेचा गैरवापर केला. या संपूर्ण व्यवहारात एचडीआयएलने ५० कोटी रुपये दिल्याचे तपासात समोर आले आहे.

‘भागीदारी नव्हे, दलाली’

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एचडीआयएलने प्रवीण राऊत यांना ५० कोटी रुपये हे कंपनीतील भागीदार म्हणून दिले, असा दावा राऊत यांनी केला होता. पण वास्तवात ही रक्कम भागीदारी म्हणून नसून दलाली म्हणून होती, असे गुरू आशिष कन्स्ट्रक्शनच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याखेरीज पालघर येथील व्यवहार करून दिल्याबद्दल प्रवीण राऊत यांना ४५ कोटी रुपये देण्यात आले. असे एकूण ११२ कोटी रुपये एचडीआयएलकडून राऊत यांना वेळोवेळी देण्यात आले. या सर्व रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. या संदर्भात ईडीने गुरू आशिष कन्स्ट्रक्शनचे मुख्य वित्तीय अधिकारी दर्शन मजुमदार यांचा जबाब नोंदवला आहे.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button