मुंबई | ‘ आयएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेबाबतच्या निधीचा अपहार केल्याच्या आरोप प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मला अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देऊन चूक केली आहे,’ असा दावा करून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार त्यांनी केलेल्या अटकपूर्व जामिनावर आज, बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच प्रकरणात आरोपी असलेले किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्जही मंगळवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्यांच्याकडूनही उच्च न्यायालयात अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत
पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेली युद्धनौका ‘ आयएनएस विक्रांत ’ भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी नागरिकांकडून जमवलेल्या ५८ कोटी रुपयांच्या निधीचा सोमय्या पिता-पुत्रांनी अपहार केला, अशा आरोपाखाली ट्रॉम्बे पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याने दोघांवर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे दोघांनीही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सोमवारी किरीट यांचा अर्ज फेटाळल्यानंतर मंगळवारी नील यांचाही अर्ज फेटाळला.
ही युद्धनौका वाचावी आणि तिचे संग्रहालयात रुपांतर व्हावे या हेतुने निधीसाठी पैसे देणारे माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ७ एप्रिल रोजी एफआयआर नोंदवला. राज्यपालांकडे निधी सोपवण्यात येईल, असे सांगून सोमय्या यांनी नागरिकांकडून निधी गोळा केला. परंतु, राज्यपाल कार्यालयात तो पोहोचलाच नाही, असे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांनी या निधीचा अपहार केला, असा आरोप आहे.
दरम्यान, सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सत्र न्यायालयाने दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठे पाऊल उचलले. या दोघांची चौकशी करायची असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना समन्स बजावले आहे. मंगळवारी हे समन्स बजावण्यात आले.