breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

किरीट सोमय्यांकडून अजित पवारांवर बहिणींच्या नावे बेनामी संपत्तीचा आरोप, सुप्रिया सुळे म्हणाल्या ट्रकभर पुरावे…

पुणे |

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हे चालतं का? असा सवाल केला. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “आम्हाला ५० वर्षांपासून आरोपांची सवय आहे. आमच्याविरोधात ट्रक भरून पुरावे होते. त्यांचं काय झालं? हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमचं सरकार दडपशाहीचं सरकार नाहीये. या देशात कुणीही काही करत असेल तर त्याला चिंता असावी, ज्यानं काही केलं नाही त्याला चिंता नाही. आम्हाला ५० वर्षांपासून आरोपांची सवय आहे. आमच्याविरोधात ट्रक भरून पुरावे होते. त्याचं काय झालं? हे सर्व उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय.”

  • “आपल्यामुळे एखादा माणूस प्रसिद्ध होत असेल तर आनंदाची गोष्ट”

“मला आधी लहान असताना या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा. जसंजसं वय वाढत गेलं तसं लक्षात आलं हे खोटे आरोप जेव्हा करतात तेव्हा त्या लोकांना खूप प्रसिद्धी मिळते. आपल्यामुळे एखादा माणूस प्रसिद्ध होत असेल तर ही किती आनंदाची गोष्ट आहे,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी किरीट सोमय्या यांना टोला लगावला आहे.

  • किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले होते?

किरिट सोमय्या म्हणाले, “अजित पवार यांनी आयकर विभागाची धाड पडल्यानंतर पहिल्याच दिवशी विधान केलं की माझ्या बहिणी निता पाटील, विणा पाटील, मेव्हणे, मोहन पाटील यांच्या घरी आयकराच्या धाडी कशाला? त्यांचा काही आर्थिक व्यवहार नाहीये. माझ्याकडे पुरावे आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवार यांच्या ७० बेनामी संपत्तीत, कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे भागीदार आहेत. मग अजित पवारांनी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणींशी बेईमानी केली?”

  • “अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का?”

“बहिणींच्या नावाने कंपन्यांमध्ये भागिदारी आहे, संपत्ती आहे. आपण म्हणता त्यांचा काही संबंध नाही. मग बहिणींच्या नावाने देखील बेनामी संपत्ती केली का? ते शरद पवार यांना मान्य आहे का?” असा थेट सवाल यावेळी किरिट सोमय्या यांनी केला. तसेच “माझं शरद पवार यांना आव्हान आहे की मी हे सर्व आयकर विभागाला पाठवणार आहे. सहकार मंत्रालयाला पण पाठवणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिलेत. यातला एक पण कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी मला हे सिद्ध करून दाखवावं,” असं आव्हान किरिट सोमय्या यांनी पवार कुटुंबाला दिलं.

किरिट सोमय्या म्हणाले, “मी जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी हे करतोय, पण पवार परिवार महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचं काम करत आहे. ते लुटीसाठी करतात, मी ती लूट जनतेसमोर जनतेसाठी ठेवण्यासाठी काम करतो शरद पवार इतके वर्ष मुख्यमंत्री राहिले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. ११ घोटाळेबाज ठाकरेंचे आता १७ झाले. ६ राखीव झालेत, हे वाढत चालले आहेत. यातील एकही घोटाळ केला नाही असं म्हणण्याची हिंमत ठाकरे-पवारांमध्ये नाही. तुम्ही मंत्री आहात जे घोटाळे केलेत त्यावर बोला ना.”

  • “पोलीसच माफिया, चोरी करत सुपारी घेतेय, पोलीस आयुक्त गायब, गृहमंत्री फरार”

“हे घोटाळे पोलिसांनी उघड करायला हवे, मात्र हे पोलिसांचा उपयोग माफिया म्हणून काम करत आहेत. पोलीसच चोरी करतेय, पोलीसच सुपारी घेतेय, पोलीस आयुक्तच गायब होतो, गृहमंत्री फरार होतो. म्हणून शेवटी जनतेने जायचं कुठं? उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, लोकायुक्त, राष्ट्रीय हरित लवाद, मानवाधिकार आयोग यांच्याकडे किरिट सोमय्या जात आहे तर त्यात चूक काय?” असंही त्यांनी नमूद केलं.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button