breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

खतगावकरांची भाजपला सोडचिठ्ठी; काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा

नांदेड |

भाजप प्रवेशाची सप्तवर्षपूर्ती अलीकडेच झाल्यानंतर जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी रविवारी काही प्रमुख समर्थकांसह या पक्षाला रामराम ठोकला. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी उपमहापौर सरजीतसिंग गील यांनीही खतगावकरांबरोबर भाजपला सोडचिठ्ठी असून, ते लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खतगावकर यांचा देगलूर-बिलोली या दोन तालुक्यांत प्रभाव असून तेथे विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने ताकद लावली आहे; पण गेले दहा-बारा दिवस खतगावकर त्यात कोठेही सहभागी नव्हते.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी खतगावकर यांनी काँग्रेससोबतचे चार दशकांचे संबंध तोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरच भाजपमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठय़ा प्रमाणावर ‘प्रवेशोत्सव’ सुरू झाले. खतगावकरांनी नांदेड जिल्ह्य़ात पक्षाचा विस्तार करताना दिग्गज नेत्यांनाही आणले; पण अलीकडच्या दोन वर्षांत त्यांचीच पक्षात घुसमट सुरू झाली. पक्षसंघटनेची सारी सूत्रे खासदार चिखलीकर व त्यांच्या परिवारात गेल्यामुळे ज्येष्ठांमध्ये अस्वस्थता होतीच; खतगावकरांनी गेले काही दिवस अनेकांशी विचारविनिमय करून पक्ष सोडण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला. भाजपच्या प्रमुख नेत्यांवर दोषारोप करण्याचे त्यांनी टाळले. भाजपला सोडचिठ्ठी देतानाच खतगावकर यांनी स्वगृही म्हणजे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे जाहीर केले. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची तारीख एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. देगलूरची पोटनिवडणूक महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली असतानाच खतगावकर यांनी भाजपला रामराम ठोकल्यामुळे खासदार चिखलीकर व त्यांच्या गटावरील दबाव वाढला आहे.

  • देशमुखांची शिष्टाई निष्फळ

भास्करराव खतगावकर भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण खासदार चिखलीकर यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना मागील आठवडय़ातच लागली होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे विभागीय संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांनी शनिवारी खतगावकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपण पक्ष सोडू नये, असे देशमुखांनी त्यांना विनवले. दोघांदरम्यान तब्बल तासभर चर्चा झाली, पण ती निष्फळ ठरल्याचे खतगावकर यांच्या रविवारच्या निर्णयानंतर स्पष्ट झाले.

  • चव्हाणांकडून स्वागत

भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या या निर्णयाचे काँग्रेस नेते व ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी स्वागत केले. या घडामोडीमुळे नांदेड जिल्ह्य़ातच नव्हे, तर मराठवाडय़ातील पक्षसंघटनेला बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button