ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘कावेरी’ ब्लॅक लिस्ट; नव्या चार सल्लागारांची नेमणूक

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध सात प्रकल्पांवर नेमणूक केलेल्या ‘कावेरी प्रोजेक्ट मॅनेजमेंट’या सल्लागाराला काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकल्याने त्याची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या सात प्रकल्पांसाठी चार सल्लागारांची नेमणूक केली जाणार आहे. या सल्लागारांना प्रकल्पातील उर्वरीत कामाच्या रकमेच्या 80 टक्क्यांपासून एक टक्क्यांपर्यंत शुल्क देण्यात येणार आहे.महापालिकेच्यावतीने प्रभाग क्रमांक दोन बो-हाडेवाडी येथील ताब्यात येणा-या गायरान जागेतील आरक्षणावर शाळा इमारत बांधण्यात येणार आहे. प्रभाग दोनमध्येच पुणे – नाशिक महामार्ग ते गट क्रमांक 1062 पर्यंतचा 18 मीटर विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. सेक्टर क्रमांक 16 मध्ये राजे शिवाजीनगर येथील रस्ते अद्ययावत पद्धतीने तयार करण्यात येणार आहेत. प्रभाग क्रमांक नऊ नेहरूनगर येथील जुनी शाळा इमारत पाडून नवीन शाळा इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच इतर स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहेत.

प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगर येथील तिरूपती चौकातील तुलसी हाईटस समोरील रस्ता ते पेठ क्रमांक एकमध्ये पुणे – नाशिक महामार्गापर्यंत जोडणारा 12 मीटर विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक आठमध्ये ठिकठिकाणी पेव्हींग ब्लॉक, रस्ता दुभाजक व रोड फर्निचर विषयक कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक आठमध्ये ठिकठिकाणी पदपथ, दुभाजक आणि रस्ता सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार आहेत. या विविध प्रकारच्या कामांसाठी महापालिका पॅनेलवरील प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात येत असते. त्यानुसार, या एकूण सात प्रकल्पांच्या कामांसाठी कावेरी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.

तथापि, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या 14 जुलै 21 रोजीच्या आदेशानुसार, कावेरी कन्सल्टंट या ठेकेदाराला तीन वर्षाकरिता काळ्या यादीत समाविष्ट करून त्यांची नियुक्ती रद्द करण्याबाबत आदेश दिले आहेत. तसेच कावेरी कन्सल्टंट यांच्याकडील कामे रद्द करण्यात आली आहेत. या प्रकल्पातील सर्व कामे सध्या चालू स्थितीत असून अर्धवट अवस्थेत आहेत. या कामांची तातडी व गरज लक्षात घेऊन जुन्या पॅनेलमधील अन्य सल्लागाराची रितसर नेमणूक करण्यास आयुक्तांनी 3 सप्टेंबर रोजी मान्यता दिली आहे.

हे प्रकल्प महत्वपूर्ण असल्याने तसेच निश्चित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाच्या दैनंदीन कामावर देखरेख करणे, कामाचा दर्जा मानकाप्रमाणे ठेवणे, वेळोवेळी साहित्याचे टेस्टींग करणे, निविदा निर्देशानुसार गुणवत्ता तपासणी करणे, मोजमापे तपासणे व ठेकेदारास देयके देण्याबाबत शिफारस करणे, इतर निविदापश्चात कामे करणे आदी सर्व सल्लागरांची कामे करणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पांसाठी सल्लागाराची नेमणूक करणे गरजेचे आहे. त्यानुसार, महापालिकेने अल्प मुदतीची निविदा नोटीस प्रसिद्ध केली.

त्यामध्ये सात प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांसाठी प्लॅनीटेक कन्सल्टंन्सी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. दोन प्रकल्पांसाठी इनव्हायरोसेफ कन्सल्टंटस यांची, तर उर्वरीत दोन प्रकल्पांसाठी पेव्हटेक कन्सल्टींग इंजिनिअरींग सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि अ‍ॅस्सुरेड इंजिनिअरींग सर्व्हीसेस यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली जाणार आहे. या कामांसाठी या सल्लागारांना प्रकल्पातील उर्वरीत कामाच्या रकमेच्या 80 टक्क्यांपासून एक टक्क्यांपर्यंत शुल्क देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button