breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

काश्मिरी पंडित पुन्हा खोऱ्यात परततील; सरसंघचालक मोहन भागवतांनी व्यक्त केला विश्वास

जम्मू |

काश्मिरी पंडित लवकरच काश्मिरी खोऱ्यात त्यांच्या घरी परतू शकतील. ते पुन्हा कधीही विस्थापित होऊ नयेत, यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले.

त्यांनी ‘काश्मीर फाइल्स’ सिनेमाची प्रशंसा केली. सन १९९०मध्ये काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून जावे लागले, यामागील वास्तवाबाबत देश आणि बाहेरही यामुळे जनजागृती झाली आहे, असे ते म्हणाले. ‘नवरेह’ या तीन दिवसीय उत्सवाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी काश्मिरी पंडित समुदायाला डिजिटल माध्यमाद्वारे संबोधित केले. ‘काश्मीर खोऱ्यात घरी परतण्याचा संकल्प पूर्ण करण्याची वेळ आली आहे. यासाठी खूप दिवस लागणार नाहीत. ते लवकरच प्रत्यक्षात येईल आणि या दिशेने आपल्याला प्रयत्न कायम ठेवावे लागतील. आपला इतिहास आणि आपले महान नेते आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक राहतील, प्रेरणा देत राहतील,’ असे भागवत यांनी नमूद केले. ‘सन २०११मध्ये दिल्लीत काश्मिरी पंडितांचा हेराथ या उत्सवात सहभागी झाल्याचा उल्लेख करून या निमित्त काश्मीर पंडित समुदायाने त्यांच्या मातृभूमीत परतण्याची प्रतिज्ञा केली,’ असे त्यांनी सांगितले.

‘प्रत्येकाच्या आयुष्यात आव्हाने येतात. तीन-दशकांपूर्वी आम्ही आमच्या देशात विस्थापित झालो. यावर उपाय काय? आम्ही झुकणार नाही आणि आमच्या घरी परत येऊन आमची प्रतिज्ञा पूर्ण झालेली पाहणार आहोत,’ असे भागवत म्हणाले. इस्राईलचा संदर्भ देऊन भागवत म्हणाले, ‘आपल्या मातृभूमीसाठी ज्यूंना १८०० वर्षे संघर्ष करावा लागला. १७०० वर्षांत त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिज्ञेसाठी फारसे काही केले गेले नाही; परंतु गेल्या १०० वर्षांत, इस्राईलने आपले लक्ष्य साध्य केले आणि जगातील आघाडीच्या देशांपैकी एक झाले.’ काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असूनही काश्मिरी पंडितांना जगाच्या वेगवेगळ्या भागांत राहावे लागले आहे. आपण कुठेही राहू शकतो; पण आपल्या मातृभूमीला विसरू शकत नाही,’ असे त्यांनी अधोरेखित केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button