ताज्या घडामोडीमुंबई

… तर मुंबईकरांवर देखील भारनियमनाची टांगती तलवार; कोळसाटंचाईने दबावाची शक्यता

  •  टाटाची भिस्त जलविद्युत व पेट्रोलियम वायूवर
  • कोळसाटंचाईने दबावाची शक्यता

    मुंबई| महावितरणने मंगळवारपासून सुरू केलेल्या भारनियमनाच्या कचाट्यात मुंबई सध्या तरी नाही. मुंबईत महावितरणखेरीज खासगी कंपन्या वीज पुरवत असल्याने मुंबईकरांना तूर्त दिलासा मिळाला आहे. पण, एकूण कोळसाटंचाईचा विचार केल्यास मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी औष्णिक सोडून अन्य स्रोतांचा अधिकाधिक उपयोग न केल्यास मुंबईतदेखील भारनियमन टाळता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

    मुंबई शहर व उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल), टाटा पॉवर व बेस्ट उपक्रम, या तीन कंपन्यांकडून वीजपुरवठा होतो. तर भांडूप ते मुलुंड व या मुंबई उनपगरासह संपूर्ण महामुंबई परिसरात महावितरणकडून विजेचा पुरवठा होतो. मुंबईची सध्याची रोजची वीज मागणी ३५०० मेगावॉटच्या घरात गेली आहे. त्यापैकी जवळपास १२५० ते १३०० मेगावॉट वीज ही कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्पातून येते. तर ४४७ मेगावॉट वीज जलविद्युत आणि २५० मेगावॉट वीज पेट्रोलियम वायूआधारित प्रकल्पातून येते. मुंबईला वीजपुरवठा करणारे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असल्यास मुंबईला १५०० मेगावॉट वीजच बाहेरुन खरेदी करावी लागेल. परंतु, निम्म्याहून अधिक वीज औष्णिक, अर्थात कोळशावर आधारित असल्यानेच भारनियमनाची टांगती तलवार मुंबईवर आहेच.

    वीज क्षेत्रातील संबंधितांनुसार, एईएमएल दररोज त्यांच्या ग्राहकांसाठी डहाणूच्या औष्णिक प्रकल्पातून ५०० मेगावॉट वीजपुरवठा करते. खर्चातील वाढ टाळण्यासाठी या प्रकल्पात अधिकाधिक स्वदेशी कोळसा वापरला जातो. पण, देशभरात स्वदेशी कोळशाच्या टंचाईची स्थिती आहे. त्यामुळेच कोळशाचा पुरवठा कमी झाल्यास वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे टाटा पॉवर कंपनी त्यांच्या ट्रॉम्बे प्रकल्पात ७५० मेगावॉट वीज निर्मिती औष्णिक प्रकल्पातून करते. त्यासाठी इंडोनेशियाहून आयात होणारा कोळसा वापरला जातो. पण, देशात कोळसाटंचाई असल्याने कोळशाचे दर भरमसाठ वाढत आहेत. परिणामी वीज दरवाढ टाळण्यासाठी येथील उत्पादन कमी केल्यास त्याचा परिणाम मुंबईच्या वीजपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. यासाठीच टाटा पॉवरने त्यांचा जलविद्युत आणि वायूआधारित प्रकल्प पूर्ण क्षमतेने वापरल्यास तसेच एईएमएलने अधिकधिक वीज हरित ऊर्जा स्रोतांकडून खरेदी केल्यास वीजसंकट टाळता येईल, असे सांगितले जात आहे.

    जलविद्युत मर्यादित

    मंगळवारी मुंबईची वीजेची मागणी ३१०० ते ३३०० मेगावॉटदरम्यान होती. त्यादरम्यान टाटा पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पातून १८० ते ३८१ मेगावॉट वीजनिर्मितीच होत होती. याबाबत टाटा पॉवरच्या प्रवक्त्यांनी सांगितले की,’ जलविद्युत हा मर्यादित स्रोत आहे. त्यामुळे त्याबाबत नियम आहेत. नद्यांमधील पाणी विविध कारणांसाठी कार्यक्षमतेने वापरले जाईल याची हमी देण्यासाठी कृष्णा जल न्यायाधिकरणाच्या सूचनांचे पालन केले जाते. परिणामी, सर्वाधिक मागणीच्या काळात विजेचे नियमन करण्यासाठी आणि अत्यावश्यक असेल तेव्हाच जलविद्युतमधून वीज तयार केली जाते.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button