breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

भाजपाकडून निष्ठावंतांना न्याय : स्थानिक नेतृत्त्वावर नाराजांना पक्षश्रेष्ठींचा सूचक संदेश!

  • पक्षाचे काम प्रामाणिकपणे केल्यास संधी मिळतेच
  • पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे आता तीन आमदार

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या स्थानिक नेतृत्त्वावर नाराज होवून राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांच्या वाटेवर असलेल्या नाराजांना पक्षश्रेष्ठींनी सूचक संदेश दिला आहे. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या उमा खापरे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली असून, नाराजांना बाहेर पडताना पुनर्विचार करावा लागेल, अशी स्थिती आहे.

राज्यात रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक लागली आहे. त्यापैकी पाच उमेदवारांनी घोषणा भाजपाकडून करण्यात आली. यापैकी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

वास्तविक, उमा खापरे या भाजपा निष्ठावंत नेत्या आहेत. स्व. गोपिनाथ मुंडे समर्थक असलेल्या खापरे यांनी महापालिकेत दोन नगरसेवक म्हणून कार्यकाळ गाजवला आहे. २००१-०२ मध्ये खापरे महापालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या. मुंडे समर्थक, नगरसेविका, विरोधी पक्षनेत्या, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव, प्रदेशाध्यक्षा असा राजकीय आलेख खापरे यांनी यशस्वी केला आहे.

भाजपामध्ये असल्यास संधी मिळू शकते, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यास भाजपाचे प्रदेश नेतृत्व यशस्वी झाले आहे. यापूर्वी राज्यसभा खासदारपदी अमर साबळे, राज्य लोकलेखा समितीवर (राज्यमंत्री दर्जा) ॲड. सचिन पटवर्धन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळावर अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशीव खाडे, उपमहापौरपदी शैलजा मोरे, केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेतेपदी एकनाथ पवार, नामदेव ढाके, स्थायी समितीवर विलास मडिगेरी यांसह विविध समिती, प्रदेश कार्यकारिणीवर भाजपाच्या निष्ठावंतांना संधी देण्यात आली. आता त्यामध्ये उमा खापरे यांना संधी देत भाजपा पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंत कार्यकर्ता हाच पक्षाचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट केले आहे.

नाराजांकडून प्रदेश नेतृत्वाशी ‘कनेक्शन’ अधिक मजबूत करण्याची तयारी…

सुमारे ८ वर्षे भाजपामध्ये काम करणारे बाबू नायर यांना पक्षाने स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली होती. मात्र, आता आगामी निवडणुकीच्या तोंडावर नायर यांनी पुन्हा काँग्रेसची वाट धरली. त्यामुळे भाजपाला मोठी गळती लागणार, अशी चर्चा सुरू झाली. असे असतानाही भाजपा पक्षश्रेष्ठींनी उमा खापरे यांना संधी देत राजकीय तळ्यात-मळ्यात करणाऱ्यांना सूचक संदेश दिला आहे. त्यामुळे भाजपात राहिल्यानंतर आपल्याला संधी मिळू शकते, असा विश्वास आता नाराजांना येवू लागल्यामुळे प्रदेश पातळीवर असलेले ‘कनेक्शन’ अधिक मजबूत करण्याची मानसिकता अनेकांनी केली आहे.

फडणवीस यांचा सबुरीचा सल्ला किती महत्त्वाचा?
२०१७ मध्ये भाजपाची सत्ता महापालिकेत आली. त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे या दोन्ही नेत्यांवर नाराज असलेल्या नगरसेवकांनी पक्षातून बाहेर पडण्याची तयारी केली. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक अनेकांनी वाढवली. याच काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजांना सबुरीचा सल्ला दिला होता. यावर शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. त्यामुळे फडणवीस यांनी दिलेला सुबरीचा सल्ला किती महत्त्वाचा होता हे उमा खापरे यांच्या उमेदवारीवरुन सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, फडणवीसांनी जो मॅसेज स्थानिक नाराजांना दिला होता, तो मॅसेज श्रीकांत भारतीय यांच्याकरवी आला होता, असे सांगितले जाते. योगायोगाने भारतीय यांनासुद्धा विधान परिषदेची उमेदवारी घोषित झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button