ताज्या घडामोडीराजकारण

जितेंद्र आव्हाडांविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल

भाजप आक्रमक, निषेध आंदोलन

ठाणे : महाड येथील मनुस्मृती दहनाच्या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर फाडल्यावरून ठाण्यात भाजपकडून गुरूवारी ठिकठिकाणी आक्रमक आंदोलन करण्यात आली. यावेळी तीव्र आंदोलन करून जितेंद्र आव्हाडांच्या छायाचित्राला काळे फासून त्यांचा पुतळा जाळण्यात आला. ठाण्यातील कोर्ट नाका, कळवा, भीमनगर आणि कोपरीत तीव्र निषेध करण्यात आला. तसेच चितळसर पोलीस ठाणे व वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

महाड येथील घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असतानाही भाजपकडून गुरूवारी शहरात आक्रमक आंदोलन करत आव्हाड यांच्यावर टिकास्त्र सोडले. ठाण्यातील कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात आमदार संजय केळकर यांच्यासह माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर, माजी नगरसेविका नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनिल हंडोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, राजेश मढवी, विक्रम भोईर, महेश कदम यांच्यासह कार्यकर्ते सामील झाले होते. तर ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर येथे झालेल्या आंदोलनात आव्हाडांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
भाजपच्या दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष आनंद बनकर यांनी वर्तकनगर पोलिसांना निवेदन देऊन आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात माजी नगरसेवक भरत चव्हाण, सुरेश कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला. त्यानंतर सुरेश कांबळे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात निवेदन देऊन आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर कळवा येथे भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलन करत कठोर कारवाईची मागणी केली.

दरम्यान महाड येथे मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले. संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून आव्हाडांनी त्यांचा घोर अपमान केला आहे. हे कृत्य अत्यंत लाजिरवाणे आणि घृणास्पद असून जितेंद्र आव्हाडांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविणारे आहे, असे म्हणत आज भाजप भंडारा जिल्हा, तालुका, शहर यांच्या वतीने आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button