breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

सोलापूर-अक्कलकोट मार्गावर जीपचा भीषण अपघात; पाच जागीच ठार तर १२ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

सोलापूर |

अक्कलकोट येथून प्रवासी भरून सोलापूरकडे येणाऱ्या जीपचा अपघात होऊन त्यात दोन महिलांसह एकूण पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कुंभारी येथे घडलीय. या अपघातामध्ये १२ प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार जीपच्या चाकाचा टायर फुटल्याने हा अपघात घडलाय. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सोलापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. जखमींवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. अक्कलकोट येथून एमएच १३ एएक्स १२३७ या क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी जीप प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन सोलापूरकडे येत होती. परंतु सोलापूरच्या अलीकडे कुंभारी (तालुका दक्षिण सोलापूर) येथे भरधाव वेगातील जीपचे पुढील चाकाचे टायर फुटले आणि जीप कलंडली. जीपमधील अनेक प्रवासी बाहेर फेकले गेले. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृत आणि जखमींमध्ये सोलापूर, पुणे आणि मुंबईच्या प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापूर-अक्कलकोट रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु कुंभारी येथे अपघातस्थळाजवळ रस्ता चौपदरीकरणाचे काम अद्यापही संथ गतीने सुरू आहे. त्याठिकाणी उड्डाणपुलाच्या उभारणी तर अक्षरशः कासवाच्या गतीने होत आहे. त्यामुळे तेथील वाहतुकीला व्यत्यय येत आहे. त्यामुळे या ठिकाणी अधुनमधून छोटेमोठे अपघात घडतात. रस्ता चौपदरीकरण पूर्ण झाले नसताना या रस्त्यावर वळसंगजवळ टोलनाका मात्र सुरू आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सय्यद बाबा मिस्त्री यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविला आहे. अपघात घडल्यानंतर स्थानिक गावक-यांनी १०८ क्रमांकाच्या शासकीय रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही रूग्णवाहिका आली नाही. शेवटी सोलापूरहून अन्य खासगी रूग्णवाहिका कुंभारीत अपघातस्थळी पाठवाव्या लागल्याचे बाबा मिस्त्री यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button