पिंपरी / चिंचवडपुणे

मेट्रो सुरु करण्याची तारीख जाहीर करणं माझ्या हातात नाही : व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित

– महिनाभरात पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो धावण्याची शक्यता

पिंपरी l प्रतिनिधी

मेट्रो सुरु करण्याइतपत काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने आता मेट्रो सुरु होण्यासाठी आणखी काही काळ विलंब होत आहे. येत्या 10 दिवसात पिंपरी चिंचवड हद्दीतील उर्वरित कामे पूर्ण करून त्यांनतर मेट्रो कधी सुरु होणार याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात 23 किलोमीटर अंतरावर मेट्रोचे काम सुरु आहे. पुणे मेट्रोचे काम अर्ध्याहून अधिक झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान डिसेंबर 2021 मध्ये मेट्रो नागरिकांसाठी सुरु करणार असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले होते.

पुणे मेट्रोचे दोन कॉरिडॉरमध्ये काम सुरु आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका भवन (पीसीएमसी) ते स्वारगेट हा पहिला कॉरिडॉर 17.4 किलोमीटरचा आहे. यामध्ये 11.4 किलोमीटर मेट्रो मार्ग जमिनीवरून (एलिव्हेटेड) आणि 6 किलोमीटरचा मेट्रो मार्ग जमिनीखालून (अंडरग्राउंड) आहे. यातील सहा मेट्रो स्टेशन पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत आहेत. उर्वरित सर्व स्टेशन पुणे महापालिका हद्दीत आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आहेत. वनाज ते रामवाडी हा दुसरा कॉरिडॉर 15.7 किलोमीटर अंतराचा आहे. यात 16 स्टेशन असून सर्व स्टेशन जमिनीवरून आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पीसीएमसी, संत तुकाराम नगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी ही सहा मेट्रो स्टेशन आहेत. त्यातील संत तुकाराम नगर हे मेट्रो स्टेशन पूर्णपणे तयार झाले आहे. तर अन्य पाच स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसात हे काम देखील पूर्ण होणार आहे.

डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, पीसीएमसी ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रो अगोदर धावेल. त्यानंतर फुगेवाडी ते स्वारगेट पर्यंत मेट्रो सुरु होईल. मेट्रो लवकरात लवकर सुरु करण्याचा माझा प्रयत्न आहे. नक्की तारीख सांगू शकणार नाही. मात्र, 15 जानेवारी पर्यंत उर्वरित कामे आणि शेवटची एक तपासणी होईल, त्यांनतर मेट्रो धावण्यासाठी तयार असेल. मात्र मेट्रो कोणत्या दिवसापासून सुरु करायची याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने मिळून घ्यायचा आहे. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मेट्रो प्रत्यक्षात नागरिकांसाठी सुरु होईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकर नागरिकांना मेट्रोमध्ये बसण्यासाठी तारीख पे तारीख मिळत आहे.

प्रवासी संख्या वाढविण्यावर मेट्रोचा भर असणार आहे. मेट्रो, बस, रेल्वे अशी कनेक्टिव्हिटी करत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यात मेट्रो मोठे योगदान देईल. रामवाडी पर्यंत मेट्रो जाणार आहे. रामवाडी ते विमानतळ जाण्यासाठी मेट्रोकडून शटल सेवा सुरु केली जाईल. त्यामुळे नागरिकांना मेट्रोने देखील विमानतळावर सहज जाता येईल. रामवाडी, येरवडा, कल्याणीनगर या तीन मेट्रो स्थानकांना ही शटल सेवा जोडली जाईल. त्याबाबत पीएमपीएमएल आणि महापालिकेसोबत बोलणे झाले आहे. या शटल मार्गावर पीएमपीएमएलच्या सध्याच्या तिकीट दरामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. पीएमपीएमएलच्या तिकीट दरात ही शटल सेवा उपलब्ध होईल, असेही डॉ. दीक्षित म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केरळमध्ये ज्याप्रमाणे वॉटर मेट्रो सुरु झाली. त्याच धर्तीवर पुण्यात देखील वॉटर मेट्रो सुरु करता येईल, असे म्हटले होते. त्याबाबत बोलताना डॉ. दीक्षित म्हणाले, “केरळमध्ये ज्या भागात वॉटर मेट्रो सुरु झाली आहे, त्या भागातील पाण्याची पातळी खोल आहे. पुण्यात तशी परिस्थिती नाही. पुण्यातील नद्यांची पाणीपातळी हवी तेवढी खोल नाही. त्यामुळे तसा प्रयोग करणे सध्या शक्य नसल्याचे डॉ. दिक्षीत यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button