ताज्या घडामोडीपुणे

इस्त्रोचे आता झेपावे शुक्राकडे, शुक्रयान मोहीम २०२४मध्ये राबवण्याची तयारी

 पुणे | चंद्र आणि मंगळाच्या कक्षेत यान पाठवण्याचा अनुभव असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आता शुक्राच्या कक्षेत यान पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. ‘शुक्रयान’ असे संभाव्य नामकरण असलेली ही मोहीम पुढील अडीच वर्षांत, म्हणजे डिसेंबर २०२४मध्ये प्रक्षेपित करण्याचा ‘इस्रो’चा प्रयत्न आहे. शुक्रावरील जमीन, वातावरण यांच्या अभ्यासासोबत त्याच्या वातावरणातील संभाव्य सूक्ष्मजीवांचा शोध घेण्याचे काम ‘शुक्रयान’करणार आहे.

भारताच्या शुक्रयान मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ‘इस्रो’तर्फे शुक्रासंबंधीच्या विज्ञानावर आधारित राष्ट्रीय परिसंवादाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या निमित्ताने शुक्रयान मोहिमेचा प्राथमिक आराखडा प्रथमच समोर आला. भारतीय आणि विदेशी वैज्ञानिक उपकरणांचा समावेश असणाऱ्या या मोहिमेतून शुक्राच्या अज्ञात पैलूंविषयी शास्त्रीय माहिती जमा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘शुक्रयाना’वर सुमारे १०० किलो वजनाची वैज्ञानिक उपकरणे बसवण्यात येणार असून, त्यासाठी आतापर्यंत १६ भारतीय आणि सात विदेशी उपकरणांचा संभाव्य अंतिम उपकरणांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

परिसंवादात झालेल्या सादरीकरणानुसार, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या शुक्राच्या जमिनीवरील आणि जमिनीखालील प्रक्रियांचा अभ्यास, त्याच्या वातावरणाच्या विविध स्तरांचा आणि त्यांमधील प्रक्रियांचा अभ्यास आणि सौरवादळांचा शुक्रावर होणारा परिणाम अभ्यासणे ही शुक्रयान मोहिमेची प्राथमिक उद्दिष्ट्ये असतील. त्याचसोबत शुक्राच्या वातावरणात या आधी सापडलेल्या फॉस्फिन वायूचा स्रोत सूक्ष्मजीव आहेत का, हे शोधण्याचा प्रयत्नही या मोहिमेतून केला जाईल. मात्र, तांत्रिकदृष्ट्या शुक्रयान मोहीम अत्यंत आव्हानात्मक असेल, असे ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून शुक्राच्या कक्षेत यान पाठवणे आणि त्यानंतर वैज्ञानिक अभ्यासासाठी शुक्राभोवतीची यानाची दीर्घवर्तुळाकार कक्षा त्याच्याच वातावरणाचा उपयोग करून कमी करत आणणे हे या मोहिमेतील प्रमुख टप्पे असतील. कमी इंधनात शुक्रावर यान पाठवण्यासाठी दर १८ महिन्यांनी पृथ्वी आणि शुक्र हे सूर्याच्या तुलनेत अनुकूल अवस्थेत येतात. मात्र, आगामी डिसेंबर २०२४ मध्ये येणाऱ्या प्रक्षेपणाच्या संधी दरम्यान मोहिमेसाठी सर्वांत कमी इंधनाची आवश्यकता असेल. त्यानंतर २०२६ आणि २०३१ मध्ये पुन्हा प्रक्षेपणासाठी अनुकूल कालावधी असेल.

शुक्रावर पाठवण्यात येणाऱ्या मोहिमेसाठीचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून, वैज्ञानिक आणि तांत्रिक बाबींचा त्यात समावेश आहे. मोहिमेसाठी येणारा अंदाजे खर्चही निश्चित करण्यात आला आहे. रॉकेट आणि यानाच्या निर्मितीसाठीच्या सर्व यंत्रणा आणि संबंधित तज्ज्ञ मनुष्यबळ तयार असल्यामुळे कमी कालावधीत ही मोहीम राबवणे शक्य आहे.

– एस. सोमनाथ, अध्यक्ष, इस्रो

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button