breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उद्योगनगरीत गुंतवणुकीसाठी इस्राईल उत्सुक; पिंपरी चिंचवड जागतिक दर्जाचे मॉडर्न शहर बनणार?

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर नियोजनबद्ध पद्धतीने विकसित होत आहे. शहरातील पायाभूत सुविधा उत्तम असून या शहराला जागतिक दर्जाचे मॉडर्न शहर बनविण्यासाठी इस्रायली माहिती व तंत्रज्ञानाचे आदान प्रदान उपयुक्त ठरेल असे मत इस्राईलचे महावाणिज्य दूत याकोव्ह फिन्केलस्टेन यांनी व्यक्त केले.

मुंबई येथील इस्राईल दूतावासाच्या तीन सदस्यीय शिष्टमंडळाने गुरूवारी (दि. १) पिंपरी चिंचवड महापालिकेस भेट दिली. याकोव्ह फिन्केलस्टेन यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या याशिष्टमंडळामध्ये अर्थ आणि व्यापार खात्याचे प्रमुख सागी इचर, अर्थ आणि व्यापार खात्याच्या व्यापार अधिकारी पर्लिनी वाठोरे यांचा समावेश होता. शिष्टमंडळाचे स्वागत महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

यावेळी शिष्टमंडळ आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, जलनिःसारण तसेच पर्यावरण आणि अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, सीटीओचे राजा डॉन, पंकज लोंढे निलेश जैन आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहराची भौगोलिक स्थिती, पायाभूत सुविधा, विविध प्रकल्प तसेच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नियोजित प्रकल्प व सुविधा आदीबाबत सादरीकरणाद्वारे शिष्टमंडळाला माहिती देण्यात आली. पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने विकसित होत आहे. या शहरात विविध उद्योगांसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची होणारी वाढ महत्वपूर्ण आहे. उद्योगनगरी बरोबरच शहराची पर्यटन तसेच मनोरंजन नगरी म्हणून नव्याने ओळख निर्माण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी सांगितले. शहराला भेडसावणाऱ्या समस्यांसाठी इस्रायली प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना करणे शक्य होईल असेही ते म्हणाले.

महावाणिज्य दूत याकोव्ह फिन्केलस्टेन म्हणाले, भारतासोबत इस्राईलचे संबंध वृद्धिंगत होत आहेत. विविध क्षेत्रांमध्ये होत असलेले आदान प्रदान या संबंधांमधील महत्वपूर्ण भाग आहे. इस्राईल मधील शहरे आणि पिंपरी चिंचवड शहर यामध्ये अनेक बाबतीत साम्य दिसून येते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे देखरेख ठेवणे सुलभ होते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नागरिकांना जलद गतीने सेवा देणे शक्य होते. महापालिकेने साधलेला शाश्वत विकास कौतुकास्पद असून स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात असलेले प्रकल्प व उपक्रम देखील आश्वासक आहेत. कोरोना काळात महापालिका प्रशासनाने केलेल्या कामाचे देखील त्यांनी यावेळी कौतुक केले.

पिंपरी चिंचवड शहरातील विकासात्मक आव्हानांवर मात करण्यासाठी इस्राईल मधील उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल. घनकचरा व्यवस्थापन, सौरउर्जा, इलेक्ट्रिक वाहने, जलनिःसारण, जलशुद्धीकरण अशा प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे तसेच नागरिकांना डिजीटल सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या दृष्टीने शहरातील विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासाठी आम्ही उत्सुक असून पिंपरी चिंचवड शहर आणि इस्राईल मधील तेल अवीव शहर यांच्यामध्ये सिस्टर सिटी म्हणून माहिती तंत्रज्ञानाच्या आदान प्रदानासह विविध क्षेत्रात गुंतवणुकीसाठीही इस्राईल उत्सुक असल्याचे यावेळी याकोव्ह फिन्केलस्टेन म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button