breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“राष्ट्रपती काय तुमच्याकडे गोट्या खेळतायत का?”, सुधीर मुनगंटीवारांना खासदार संजय राऊतांचं प्रत्युत्तर!

मुंबई |

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन जसं वादळी ठरलं, तसाच या अधिवेशनाचा शेवटचा दिवस देखील वादळी ठरला. विशेषत: विद्यापीठ सुधारणा विधेयक राज्य सरकारने मंजूर करून घेतल्यानंतर त्यावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारनं या माध्यमातून राज्यपालांच्या अधिकारांवरच अतिक्रमण केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. त्यासंदर्भात सभागृहात बोलताना भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला दिलेल्या आव्हानाला आज शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत झाल्यानंतर त्यावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेत सरकारवर टीका केली. सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला असतानाच त्यांच्या मागे बसलेले सुधीर मुनगंटीवार उठून उभे राहिले आणि त्यांनी सरकारला आव्हान दिलं.

  • विधानसभेत नेमकं काय झालं?

“आठवण ठेवा, सरकार बरखास्त नाही केलं, तर नाव बदला, एवढी बदमाशी आली आहे का? मी कोर्टात जाईन, सुप्रीम कोर्टात जाईन”, अशा शब्दांत मुनगंटीवारांनी आव्हान दिलं. देवेंद्र फडणवीसांनी देखील या विधेयकावर आपले आक्षेप यावेळी नोंदवले. “आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुटं सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आहे हे आज सिद्ध झालं. विधानसभेत विद्यापीठाच्या कायद्यावर चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक, ठरवून चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेऊन चर्चा न करता, हे विधेयक मंजूर करून घेण्याचं पाप आज सरकारने केलं आहे”, असं फडणवीस म्हणाले.

  • “मुनगंटीवारांना नाव प्रिय नाही का?”

मुनगंटीवार यांच्या आव्हानाला संजय राऊतांनी आज खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. “मुनगंटीवारांना नाव बदलावंच लागेल. त्यांना त्यांचं नाव प्रिय नाहीये का? आम्हाला त्यांचं नाव फार आवडतं.. सुधीर. त्यांना, त्यांच्या कुटुबाला त्यांचं नाव आवडत नसेल, तर त्यांचं नाव बदलण्याची व्यवस्था आम्ही करू. कारण सरकार बरखास्त करता येणार नाही. तुम्ही ते करून दाखवा हे मी पुन्हा सांगतो”, असं संजय राऊत म्हणाले.

  • हा काय पोरखेळ आहे का?

“हा का पोरखेळ आहे का? १७० आमदारांचा पाठिंबा असणारं बहुमतातलं सरकार बरखास्त करून दाखवीन म्हणतायत. राष्ट्रपती काय तुमच्याकडे चंद्रपुरात जंगलात गोट्या खेळतायत का? की तुम्ही त्यांच्याकडे जाऊन धुणीभांडी करताय? की त्यांचा बरखास्तीचा स्टँप तुम्ही इथे आणून ठेवलाय? कुणाला शिकवताय तुम्ही?”अशी संतप्त प्रतिक्रिया देखील संजय राऊतांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button