breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेविका माया बारणे निवडणूक फंड जमा करताहेत काय? : नगरसेवक अभिषेक बारणे

महिला प्रशिक्षणावरुन खोटे आरोप केल्याचे दावा
सात महिन्यांपूर्वीच्या पत्राचा बारणेंना विसर पडला
भाजपा नगरसेवक अभिषेक बारणे यांची सडकून टीका

पिंपरी । प्रतिनिधी
थेरगाव येथील नगरसेविका माया बारणे यांनी महिला प्रशिक्षण आणि कोविड काळात स्वयंसेवक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेसह भाजपावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारणे निवडणूक फंड जमा करण्यासाठी अधिकारी आणि ठेकेदारांना वेठीस धरीत आहेत का? असा सवाल भाजपाचे नगरसेवक अभिषेक बारणे यांनी उपस्थित केला आहे.
नगरसेविका माया बारणे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून शहरातील सर्वच प्रभागात देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण उपक्रमांमध्ये तब्बल ५७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. तसेच, आयुक्त, प्रशासनाच्या भूमिकेवरही संशय निर्माण केला.
याबाबत अभिषेक बारणे म्हणाले की, २०२०-२१ मध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेला महापालिका प्रशासानाने एकूण ४८ कोटी ३८ लाख ९९ हजार ५१२ रुपये अदा केले आहेत. त्यासाठी संस्थेला ८ कोटी ७१ लाख १ हजार ९१२ रुपये जीएसटी संबंधित ठेकेदार संस्थेने भरली आहे. अशाप्रकारे एकूण ५७ कोटी १० लाख १ हजार ४२४ रुपये होता. असे असताना ५७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप बारणे यांनी केला. मात्र, ५७ कोटी रुपयांच्या कामात ५७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार कसा होवू शकतो हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, ठेकेदार संस्थेने भरलेला जीएसटी तरी भ्रष्टाचाराच्या खोट्या आकड्यातून वजा करायला हवा, असा टोलाही नगरसेवक बारणे यांनी लगावला आहे.
२०२०-२१ मध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पिंपरी-चिंचवडमधील तब्बल ६१ हजार १५५ लाभार्थींचा प्रशिक्षण देण्यात आले. विविध १४ प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रशासनाने हाती घेतला. इच्च्छुक महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे ही त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांच्या स्वाक्षरीने साक्षांकित करुनच महापालिकेत सादर केलेली असतात. सदरील साक्षांकित केलेल्या प्रतीसुध्दा ३ ते ४ अधिकारी तपासून नंतर पात्र लाभार्थींची यादी ठरवली जाते. नगरसेवकांच्या मदतीने तयार केलेली यादी प्रशासन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेला पाठवते. मग, संस्था संबंधित लाभार्थींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पूर्ण करते.

दुसरीकडे, कोरोना काळात शहरातील रहिवाश्यांना कोविड-१९ याविषयी जागरुकता व्हावी. यासाठी कोविड-१९ संदर्भातले प्रशिक्षण हे प्राधान्याने घेण्याच्या सूचना तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार वैद्यकीय विभागाच्या गाईडलाईननुसार प्रशिक्षण घेण्यात आले होते. विशेष कोविड-१९ प्रशिक्षणांमुळे शहरातील सर्व भागात जनजागृतीस मदत झाली आहे आणि पिंपरी चिंचवड मध्ये कोविड-१९ चा प्रसार नियंत्रित करण्यात मदत झाली आहे. कोरोना काळात शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या कोविड अनलॉक प्रक्रिया व वैद्यकिय विभागाने सूचित केलेल्या गाईडलाईननुसारच प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे नगरसेविका माया बारणे यांनी केलेले आरोप राजकीय हेतुपुरस्सर आहेत, हे सिद्ध होते.
सात महिन्यांपूर्वीच्या पत्राचा बारणेंना विसर…
‘‘ मे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने यापूर्वी वस्तीपातळीवर उत्तम प्रकारे काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामाबाबत सन्माननीय सदस्यांसहीत सर्वांनीच त्यांचे कौतुक केलेय व प्रशिक्षण देण्याचा उद्देशही चांगला आहे.’’ असा स्पष्ट उल्लेख असलेले पत्र नगरसेविका माया बारणे यांनी स्वत: स्वाक्षरी करुन दि.१५ जुलै २०२१ रोजी नागरवस्ती विभागाच्या उपायुक्तांना दिले आहे. असे असताना केवळ सात महिन्यांत माया बारणे यांना स्वत:च्या पत्राचा विसर पडला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नगरसेविका बारणे राष्ट्रवादी प्रवेश निश्चित म्हणूनच आरोप..
काही दिवसांपूर्वी त्यांचे पती माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका बारणे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे माया बारणे भाजपा आणि प्रशासनाला ‘टार्गेट’ करुन निवडणूक फंड जमा करीत आहेत, अशी टीका नगरसेवक अभिषेक बारणे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button