breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

#IPL2021 पृथ्वी शॉची शानदार फटकेबाजी; दिल्लीचा कोलकातावर सहज विजय

अहमदाबाद – आयपीएलच्या मैदानावर काल रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. कोलकाताने दिल्लीला विजयासाठी 155 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लीने 16.3 षटकांत 7 विकेट्स राखून पूर्ण केले. सलामीवीर पृथ्वी शॉ दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. त्यांने 41 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने तब्बल 200.00 च्या स्ट्राईक रेटने दमदार 82 धावांची खेळी केली. तर शिखर धवनने 46 धावांची खेळी केली.

सामन्याच्या सुरुवातीला नितीश राणा आणि शुबमन गिल यांनी कोलकाताच्या डावाची सुरुवात केली. २५ धावांची भागीदारी केल्यानंतर दिल्लीचा फिरकीपटू अक्षर पटेलने कोलकाताला पहिला दणका दिला. अक्षरच्या गोलंदाजीवर नितीश राणा वैयक्तिक १५ धावांवर यष्टिचित झाला. त्यानंतर शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी पहिल्या पॉवरप्लेपर्यंत ४५ धावा केल्या. अर्धशतकी भागीदारीकडे कूच करत असताना मार्कस स्टॉइनिसने १०व्या षटकात राहुल त्रिपाठीला (१९) माघारी धाडले. राहुलनंतर आलेल्या कर्णधार ईऑन मॉर्गनला ललित यादवने भोपळाही फोडू दिला नाही. स्टीव्ह स्मिथने मॉर्गनचा झेल टिपला. याच षटकात ललितने सुनील नरिनचाही शून्यावर काटा काढला. अवघ्या १० धावांत कोलकाताने ३ गडी गमावले. मागील काही सामन्यात अपयशी ठरलेला शुबमन गिल या सामन्यात चांगल्या लयीत दिसत होता. मात्र १३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. आवेश खानने त्याला वैयक्तिक ४३ धावांवर स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. शुबमनने आपल्या खेळीत ३ चौकार आणि एक षटकार लगावला. शुबमनचा झेल हा स्मिथचा ५०वा आयपीएल झेल ठरला. आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांनी कोलकाताला शंभरी गाठून दिली. १७व्या षटकात कार्तिक (१४) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यानंतर रसेलने शेवटच्या षटकात केलेल्या हाणामारीमुळे कोलकाताला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. त्याने २७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४५ धावांची खेळी केली. २० षटकात कोलकाताने ६ गडी गमावत १५४ धावा फलकावर लावल्या.

त्यानंतर १५५ धावांचे आव्हान घेऊन दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने शिवम मावीच्या पहिल्याच षटकात ६ चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. पहिल्या षटकात दिल्लीने २५ धावा वसूल केल्या. या पराक्रमानंतर पृथ्वीने आपली आक्रमक फलंदाजी सुरू ठेवत संघाला चौथ्या षटकाच्या आधीच अर्धशतकी पल्ला गाठून दिला. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये दिल्लीने बिनबाद ६७ धावा फलकावर लावल्या. यंदाच्या हंगामातील या पॉवरप्लेमधील सर्वाधिक धावा ठरल्या. ८व्या षटकात पृथ्वीने १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या हंगामातील हे वेगवान अर्धशतक ठरले. तर दुसऱ्या बाजूला असलेल्या शिखर धवनने संयमी आणि पृथ्वीने आक्रमक फलंदाजी करत कोलकाताला नामोहरम केले. शॉने धवनसह १०व्या षटकात दिल्लीचे शतक फलकावर लावले. १३ षटकात या दोघांनी १२३ धावांची भागीदारी केली. १३२ धावांची भागीदारी उभारल्यानंतर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने १४व्या षटकात शिखर धवनला पायचित पकडले. धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची खेळी केली. विजयासाठी ९ धावांची आवश्यकता असताना कमिन्सने पृथ्वीला बाद केले. पृथ्वीने ४१ चेंडूत तब्बल ११ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ८२ धावांची दमदार खेळी केली. पृथ्वीनंतर कमिन्सने ऋषभ पंतलाही (१६) बाद करत दिल्लीचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्कस स्टॉइनिसने १७व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाला चौकार मारत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button