breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#IPL2021 अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईवर 6 विकेट्सने विजय

चेन्नई – आयपीएलच्या मैदानावर काल रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने हे विजयी आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. दिल्लीकडून ‘गब्बर’ शिखर धवनने सर्वाधिक 45 धावा केल्या, तर स्टीव्ह स्मिथने 33 धावांची खेळी केली. तर मुंबईकडून जयंत यादव, कायरन पोलार्ड, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

मुंबईकडून रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉकने डावाची सुरुवात केली. मात्र तिसऱ्या षटकात दिल्लीचा गोलंदाज मार्कस स्टॉइनिसने क्विंटन डि कॉकला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. डि कॉकने 2 धावा केल्या. त्यानंतर रोहितने सूर्यकुमारला हाताशी घेत पहिल्या पॉवरप्लेमध्ये मुंबईसाठी 1 बाद 55 धावा केल्या. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर आवेश खानने दिल्लीला यश मिळवून दिले. चांगल्या फॉर्मात खेळणाऱ्या सूर्यकुमारला मुंबईने 7व्या षटकात गमावले. सूर्यकुमारने 24 धावा केल्या. त्यानंतर अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या रोहितला अमित मिश्राने आपल्या जाळ्यात अडकवले. मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित स्मिथकडे झेल देऊन बसला. त्याने 3 षटकार आणि 3 चौकारांसह 44 धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. मिश्राने हार्दिक पंड्याला शून्यावर बाद केले. हार्दिकनंतर कृणाल पंड्याही स्वस्तात बाद झाला. त्याला ललित यादवने बाद केले. त्यानंतर आलेल्या कायरन पोलार्डला मिश्राने आपल्या गुगलीत अडकवले. या पडझडीनंतर ईशान किशन आणि जयंत यादवने छोटेखानी भागीदारी उभारली. किशनने 26, तर यादवने 23 धावा केल्या.

मग मुंबईच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. फिरकीपटू जयंत यादवने दिल्लीचा मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉ याला दुसऱ्याच षटकात माघारी पाठवले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि शिखर धवन संघासाठी उभे राहिले. पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने 1 बाद 39 धावा केल्या. 9व्या षटकात स्मिथ आणि धवनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर कायरन पोलार्डने मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. त्याने स्टीव्ह स्मिथला वैयक्तिक 33 धावांवर पायचित पकडले. मात्र सुसाट फॉर्मात असलेला धवन संघाला विजय मिळवून देईल असे वाटत होते पण 15व्या षटकात दिल्लीने धवनला गमावले. मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरने त्याला कृणालकरवी झेलबाद केले. धवनने 5 चौकार आणि एका षटकारासह 45 धावांची खेळी केली. धवननंतर पंतही स्वस्तात माघारी परतला पण शिमरोन हेटमायर आणि ललित यादव यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीने 19.1 षटकात 4 गडी गमावत हे आव्हान गाठले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button