breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2021 : केकेआरने शेवटच्या षटकात विजय मिळवून प्ले ऑफची आस ठेवली जिवंत

अवघ्या 116 धावांसाठी हैदराबादने केकेआरचा घाम काढला. दुबईच्या मैदानावर झालेल्या आजच्या दुसऱ्या सामन्यात केकेआर संघाने सहा गडी राखत हैदराबाद वर मात करत आपले आव्हान कायम ठेवले. कमी धावसंख्येच्या सामन्यात धीरोदात्त खेळी करणारा युवा शुभमन गील ठरला विजयाचा शिल्पकार आणि सामन्याचा मानकरी. स्पर्धेतून याआधीच आव्हान संपलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघाने आजही तशीच निराशाजनक कामगिरी चालू ठेवली.

आयपीएल 2021 ची आजची ही बरोबर 49 वी मॅच, ज्यामध्ये आव्हान संपलेले हैदराबाद आणि अजूनही चौथी टीम असण्याची अपेक्षा बाळगून लढणाऱ्या केकेआरमध्ये लढत होती. ज्यामध्ये केन विलीएम्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो कोलकाता संघाच्या गोलंदाजांनी पूर्णतः चुकीचा ठरवत सनरायजर्स हैदराबादला केवळ 115 धावात रोखून ठेवले.

क्रिकेट हा खेळ फारच विलक्षण आहे. जिथे कालचा राजा आजचा भिकारी सिद्ध होतो, सनरायजर्सला ही अनुभूती पावलोपावली सॉरी सामन्यागणिक येत आहे. कधी काळी ही स्पर्धा जिंकणाऱ्या सनरायजर्सचा सन यावर्षी अपवादानेच राइज झाला, अन्यथा तो नेहमीच पराभवाच्या राहु-केतूने गिळलेलाच दिसला, यातही प्रतिस्पर्धी संघाच्या प्रभावी कामगिरीपेक्षा संघाची हाराकिरीच जास्त वेळा दिसली.

आजही त्याचेच प्रत्यंतर आले. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय किती चुकीचा होता, याचे प्रत्यंतर सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर आले. जेव्हा वृद्धीमान सबा एकही धाव न काढता साऊदीची शिकार ठरला. या धक्क्यातून सावरत नाही तोच जेसन रॉय सुद्धा तंबूत परतला.

कर्णधार केन, प्रियम गर्ग आणि अब्दुल समदचा तोकडा प्रतिकार सोडता सनरायजर्सचे इतर फलंदाज आले कधी आणि तंबूत परतले कधी हे समजण्याआधीच निर्धारित 20 षटके संपली सुद्धा होती. ज्यात सनरायजर्सच्या सूर्यानी जराही न तळपता तंबूत विश्रांती घेणे पसंत केले. ज्यामुळे कोलकाता संघापुढे केवळ आणि केवळ 116 धावांचे नाममात्र लक्ष उभे होते.

कर्णधार केन विलीएम्सन सर्वाधिक 26 धावा नोंदवू शकला तर अब्दुल समदने 25 तर युवा प्रियम गर्गने 21 धावांचे योगदान दिले. केकेआरकडून शिवम मावी, टीम साऊदी आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स मिळवून सनरायजर्स हैदराबादला केवळ 115 धावांवर रोखून धरले.

116 धावा विजयासाठी आणि प्ले ऑफ मधे जाण्यासाठी गरजेच्या असल्याने केकेआरने याला गाठायचेच हा ठाम निश्चय करून खेळ केला. युवा पण प्रतिभावंत शुभमन गीलने आज शुभ सुरुवात करून देताना वेंकटेश अय्यरच्या साथीने रणशिंग फुंकले पण आज अय्यर जरा अंमळ लवकरच बाद झाला. त्याला होल्डरने कर्णधार केनच्या हातून केवळ आठ धावांवर झेलबाद केले.

त्याच्याजागी आलेला आणि या स्पर्धेत बऱ्यापैकी फॉर्मात असणारा राहुल त्रिपाठी पण आज लवकरच बाद झाला. पण याने शुभमन गील जराही विचलित झाला नाही, त्याने आज जबरदस्त आत्मविश्वास दाखवत खेळ केला आणि आपले या स्पर्धेतले पहिले अर्धशतक नोंदवले.

त्याला नितीश राणाने चांगली साथ दिली, मात्र गीलला सिद्धार्थ कौलने तर नितीश राणाला होल्डरने थोड्या चेंडूच्या फरकाने तंबूत वापस पाठवल्याने केकेआर गडबड करते की काय, असे वाटायला लागले होते, पण दिनेश कार्तिक आणि मॉर्गन या माजी आणि आजी कर्णधारांनी शांत डोक्याने खेळ करत अधिक पडझड होऊ दिली नाही आणि शेवटच्या षटकात संघाला सहा गडी राखून विजयी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button