breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2021: भुवनेश्वरने अखेरच्या षटकात डिव्हिलियर्सला रोखले;हैदराबादने सामना ४ धावांनी जिंकला

अबु धाबी – सनरायझर्स हैदराबादने ठेवलेल्या १४२ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर बेंगलोरला ( Bangalore vs Hyderabad ) २० षटकात ६ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादने सामना ४ धावांनी जिंकला. अखेरच्या षटकात आरसीबीला १३ धावांची गरज असताना भुवनेश्वर कुमारने चांगला मारा करत डिव्हिलियर्ससारख्या खेळाडूलाही बांधून ठेवले. आरसीबीकडून मॅक्सवेलने ४० तर पडिक्कलने ४१ धावांची खेळी केली. हैदराबादकडून प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत विजयाला हातभार लावला.

सनरायझर्स हैदराबादने ठेवलेल्या १४२ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर बेंगलोरची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने सलामीला आलेल्या विराट कोहलीला ५ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर सिद्धर्थ कौलने डॅनियल ख्रिस्तियनला १ धावेवर बाद करत आरसीबीची अवस्था २ बाद १८ अशी केली.

यानंतर देवदत्त पडिक्कल आणि श्रीकार भारतने आरसीबीचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न उमरान मलिकने हाणून पाडला. त्याने श्रीकार भारतला १२ धावांवर बाद केले. श्रीकार बाद झाल्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आपला गेल्या सामन्यातील फॉर्म कायम राखत याही सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करण्यास सुरुवात केली.

मॅक्सवेलने आरसीबीला सावरले
मॅक्सवेलने पडिक्कलच्या साथीने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. ग्लेन मॅक्सवेल आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता. मात्र विल्यमसनने त्याला धावबाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर आरसीबीची धावगती मंदावली. ही मंदावलेली धावगती वाढवण्याचा प्रयत्न देवदत्त पडिक्कलने केला. मात्र राशिद खानने त्याला ४१ धावांवर बाद करत आरसीबीला पाचवा धक्का दिला.

निम्मा संघ माघारी गेल्यानंतर एबी डिव्हिलियर्सने शाहबाज अहमदने आरसीबीची धावगती वाढवण्यास सुरुवात केली. मात्र ९ चेंडूत १४ धावांची गरज असताना शाहबाज अहमद १४ धावा करुन बाद झाला. त्याला होल्डरने बाद केले. १९ वे षटक टाकणाऱ्या होल्डरने ५ धावा देत एक विकेट घेतली.

आरसीबीला अखेरच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती. स्ट्राईकवर गार्टन होता. भुवनेश्वरने पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर गार्टनने एक धाव करुन एबी डिव्हिलियर्सकडे स्ट्राईक दिला. ४ चेंडूत १२ धावांची गरज असताना डिव्हिलियर्सने तिसऱ्या चेंडूवर धाव घेतली नाही. त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने षटकार मारत सामना २ चेंडूत ६ धावा असा जवळ आणला. मात्र भुवीने पाचवा चेंडून फुलटॉस टाकूनही त्यावर धाव झाली नाही. डिव्हिलियर्सने तो चेंडू कव्हर्सच्या हातात मारला. अखेरच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना डिव्हिलियर्सला एकच धाव घेता आली. त्यामुळे हैदराबादने सामना ४ धावांनी जिंकला.

तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद  यांच्यातील सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीच्या जॉर्ज गार्टनने अभिषेक शर्माला १३ धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.

त्यानंतर मात्र जेसन रॉय आणि केन विल्यमसन यांनी डाव सावरत संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. या दोघांनी सावध फलंदाजी करत संघाला १० षटकात ७६ धावांपर्यंत पोहचवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूत ७० धावांची भागीदारी रचली. अखेर हर्षल पटेलने केन विल्यमसनचा ३१ धावांवर त्रिफळा उडवत ही जोडी फोडली.

ख्रिस्तियानचे हैदराबादला पाठोपाठ दोन हादरे 
विल्यमसन बाद झाल्यानंतर आलेल्या प्रियम गर्गही १५ धावांची भर घालून बाद झाला. त्याला ख्रिस्तियानने बाद केले. दरम्यान, हैदराबादने आपले शतक पूर्ण केले. एक बाजू लावून धरलेल्या जेसन रॉय आपल्या अर्धशतकाकडे कूच करत होता. मात्र ख्रिस्तियानने त्याला अर्धशतक पूर्ण करु दिले नाही. तो ४४ धावा करुन बाद झाला.

अखेरची पाच षटके राहिली असताना रॉय बाद झाल्याने हैदराबादची धावगती वाढवण्याची जबाबदारी वृद्धीमान साहा आणि अब्दुल समाद यांच्यावर होती. दरम्यान, यझुवेंद्र चहलने समादला १ धावांवर माघारी धाडत हैदराबादला पाचवा धक्का दिला. समाद बाद झाल्यानंतर साहा आणि जेसन होल्डर यांनी हैदराबादची धावगती वाढवण्यास सुरुवात केली. मात्र हर्षल पटेलने साहाला १० धावांवर बाद करत हैदराबादला मोक्याच्या क्षणी धक्का दिला. याचबरोबर सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर होल्डरला बाद करत हैदराबादला २० षटकात ७ बाद १४१ धावांवर रोखले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button