breaking-newsक्रिडा

IPL 2018 : विजयी लय कायम राखण्याचे मुंबई-कोलकातासमोर आव्हान

मुंबई – स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले असताना पंजाबवर मात केल्यामुळे जीवदान लाभलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघासमोर आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील आज (रविवार) रंगणाऱ्या लढतीत आतापर्यंत प्रभावी ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान आहे.

आयपीएलच्या अकराव्या मोसमात चांगला संघ असूनही सांघिक समन्वयाच्या अभावामुळे 9 पैकी सहा सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या मुंबईने गेल्या दोन सामन्यांमध्ये सांघिक कामगीरीच्या बळावर विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवले आहे. तर दुसरीकडे स्पर्धेत अव्वल सांघिक कामगिरीच्या बळावर गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोलकाताने आतापर्यंत फलंदाज आणि गोलंदाजांच्या जोरावर आपल्या 9 पैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यांना 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आयपीएलच्या चालू मोसमात मुंबईच्या मार्कंडे आणि बुमराह वगळता इतर गोलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत असल्याने बलाढ्य फलंदाजी असतानाही तीच मुंबईची कुमकुवत बाजू ठरत आहे त्यामुळे आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा करतानाच अखेरच्या षटकांमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न मुंबईच्या गोलंदाजांना करावा लागणार असून मधल्या फळीतील फलंदाजांनाही अखेरच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढणे गरजेचे आहे.

त्यातच कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत उत्तम कामगिरी बजावली असून त्यांच्याकडे दिनेश कार्तिक, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, नितीश राणा, शुभमन गिल यांसारखे तगडे फलंदाज आहेत. त्याचवेळी शिवम मावी, मिचेल जॉन्सन, सुनील नारायण, कुलदीप यादव, पियुष चावला यांसारखे चांगले गोलंदाज असल्यामुळे कोलकाता संघात कोणत्याही वेळी सामना आपल्या बाजूने फिरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवायचा असल्यास आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

रोहित शर्मा टी-20 मध्ये 300 षटकार ठोकणारा पहिला भारतीय 
भारताचा सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ट्‌वेंटी-ट्‌वेंटी क्रिकेटच्या वेगवेगळया स्पर्धांमध्ये 300 षटकार ठोकणार पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर काल झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहितने मुजीब उर रहमानच्या 17 व्या षटकात षटकार ठोकून 300 षटकारांचा टप्पा गाठला.

रोहितने आतापर्यंत टी-20च्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 78 आणि आयपीएलमध्ये 183 षटकार ठोकले आहेत. अन्य 40 षटकार चॅम्पियन्स लीग, सय्यद मुश्‍ताक अली ट्रॉफी आणि अन्य स्थानिक स्पर्धांमध्ये मारले आहेत. रोहितच्या नावावर एकूण 301 षटकार आहेत. टी-20मध्ये ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक 844, कायरॉन पोलार्डच्या नावावर 525, ब्रेन्डन मॅक्‍युलमच्या नावावर 445, ड्‌वेन स्मिथच्या नावावर 367, शेन वॉटसनच्या नावावर 357, डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 319 आणि रोहितच्या नावावर 301 षटकार आहेत.

प्रतिस्पर्धी संघ – 
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कायरॉन पोलार्ड, मुस्तफिझुर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, ईशान किशन, राहुल चाहर, एविन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जीन पॉल ड्युमिनी, ताजिंदर सिंग, शरद लुंबा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयंक मार्कंडे, अकिला धनंजय, अनुकूल रॉय, मोहसीन खान, एम. डी. निधीश व मिचेल मॅकक्‍लॅनेघन.

कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, नितीश राना, सुनील नारायण, कुलदीप यादव, पियुष चावला, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, मिचेल जॉन्सन, शुभमन गिल, विनय कुमार, रिंकू सिंग, कॅमेरॉन डेलपोर्ट, जावोन सिरलेस, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी व टॉम करन.
सामन्याची वेळ- दुपारी 4 पासून.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button