breaking-newsक्रिडा

IPL 2018 : पंजाबविरुद्ध मुंबईला आज विजयाचीच गरज

मुंबई – आयपीएलच्या अकराव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय खराब झाली आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सला केवळ 2 सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला आहे, त्यामुळे उरलेल्या सर्व 6 सामन्यांमध्ये विजय मिळविणे मुंबईसाठी अपरिहार्य आहे. दडपणाखाली असलेल्या मुंबईचा सामना आज गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध रंगणार आहे. पंजाबने मालिकेत आतापर्यंत सात सामन्यांपैकी पाच सामन्यांत विजय मिळवला असून दोन सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी मालिकेत आतापर्यंत रविचंद्रन अश्‍विनच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली असून त्यांची बाद फेरीकडे वाटचाल सुरू आहे. पंजाबच्या सर्वच खेळाडूंनी सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करताना संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले आहे. 

 

त्यातच पंजाबचे सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल हे दोघे प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करीत आहेत. त्यामुळे पंजाबचा संघ मालिकेत समतोल कामगिरी करताना दिसून येतो आहे. त्यातच त्यांचे गोलंदाज अंकित राजपुत, अँड्रयूृ टाय हे प्रतिस्पर्धी संघांवर दडपण आणत धावा रोखण्यात यशस्वी ठरत असल्याने गोलंदाजीतही पंजाब सरस कामगिरी करताना दिसून येत आहे. दुसरीकडे चांगले खेळाडू असूनही त्यांच्याकडून अपेक्षित कामगीरी होत नसल्याकारणाने गुणतालिकेत अखेरच्या स्थानी असणाऱ्या मुंबईला आजच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी किमान 16 ते 17 अतिरिक्‍ति धावा दिल्या.

मुंबईची गोलंदाजी सुरू असताना 10व्या षटकात हार्दिक पांडयाच्या गोलंदाजीवर बंगळुरूच्या ब्रेन्डन मॅक्‍युलमने एका चेंडूंत 13 धावा वसूल केल्या. हार्दिकच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मॅक्‍युलमने षटकार ठोकला. हार्दिकने छातीच्या उंचीवर हा चेंडू टाकल्याने पंचांनी नो बॉल दिला. त्यानंतर पुढच्या फ्री हिट असलेल्या चेंडूवर मॅक्‍युलमने पुन्हा षटकार ठोकला. नो बॉलची एक धाव मिळून मुंबईने एकाच चेंडूवर 13 धावा दिल्या. असाच प्रकार पुन्हा 20व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर घडला. केवळ गोलंदाज आणि फलंदाज बदलले होते. मिचेल मॅकक्‍लॅनेघनच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कॉलिन डी ग्रॅंडहोमने षटकार ठोकला. पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केला. त्याच्याच पुढच्या चेंडूवर कॉलिनने पुन्हा षटकार ठोकला. नो बॉलची एक धाव मिळून पुन्हा एकाच चेंडूवर 13 धावा गेल्या. हे दोन नो बॉल मुंबईला बरेच महाग पडले. अन्यथा बंगळुरूला 150 धावांवर रोखता आले असते. त्यामुळे आजचा सामना जिंकावयाचा असल्यास मुंबईला आपल्या गोलंदाजीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

प्रतिस्पर्धी संघ – 
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कायरॉन पोलार्ड, मुस्तफिझुर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, ईशान किशन, राहुल चाहर, एविन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जीन पॉल ड्युमिनी, ताजिंदर सिंग, शरद लुंबा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयंक मार्कंडे, अकिला धनंजय, अनुकूल रॉय, मोहसीन खान, एम. डी. निधीश व मिचेल मॅकक्‍लॅनेघन.

किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), अक्षर पटेल, लोकेश राहुल, अँडयू टाय, ऍरॉन फिंच, मार्कस स्टॉइनिस, करुण नायर, मुजीब उर रेहमान, अंकित सिंग राजपूत, डेव्हिड मिलर, मोहित शर्मा, बारिंदर सिंग स्रान, युवराज सिंग, ख्रिस गेल, बेन ड्‌वारशुईस, अक्षदीप नाथ, मनोज तिवारी, मयंक आगरवाल, मंझूर दर, प्रदीप साहू व मयंक डागर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button