breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हॉटेलवर सशस्त्र दरोडय़ाच्या तपासात आंतरराज्य टोळीचा छडा

सोलापूर |

सोलापूर-विजापूर महामार्गावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे काही दिवसांपूर्वी एका हॉटेल परमिट रूमवर पहाटे पडलेल्या सशस्त्र दरोडय़ाचे धागेदोरे उकलून एका आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीचा छडा लावण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या टोळीने महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मिळून ३२ गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. दहा जणांच्या या टोळीतील दोघांना अटक झाली असून त्यांच्याकडून सशस्त्र दरोडय़ात वापरण्यात आलेल्या बोलेरो गाडीसह विदेशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. टोळीतील इतर आठजणांचा शोध घेण्यात येत असल्याचे सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. सुखदेव धर्मा पवार (वय ५५) व अंबादास शंकर गायकवाड (दोघे रा. होटगी, ता. द. सोलापूर) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत.

गेल्या ६ फेब्रुवारी रोजी नांदणी येथील एका हॉटेलवर सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी हॉटेलचे व्यवस्थापक गंगाराम बयाजी वाघमोडे (वय ३४, रा. शिरनांदणी, ता. मंगळवेढा) यांना मारहाण करून त्यांचे हात-पाय, तोंड कापडाने बांधून हॉटेलमधील विदेशी दारूचा साठा, रोकड आणि भ्रमणध्वनी संच असा एकूण दोन लाख ३७ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुटला होता. या गुन्ह्याचा तपास होण्यासाठी गुन्हे शाखेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात काही बंद हॉटेलमधून दारू साठा चोरून नेण्याचे प्रकार घडत होते. त्या अनुषंगाने केलेल्या तपासात पोलिसांच्या अभिलेखावरील काही सराईत गुन्हेगारांची नावे निष्पन्न झाली होती.

त्यापैकी सुखदेव पवार यास गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नांदणी येथील हॉटेलवरील दरोडय़ाची कबुली दिली आणि इतर नऊ साथीदारांची नावेही सांगितली. तसेच दरोडय़ात लुटलेला विदेशी दारूचा साठा होटगीत एका बंद खोलीत दडवून ठेवल्याचीही कबुली दिली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र वांजरे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरविली. यात टोळीत दहा जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यातील अंबादास शंकर गायकवाड यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या बोलेरो गाडीसह लुटलेला विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. या टोळीतील अन्य आठ साथीदारांचा शोध घेण्यात येत असून या टोळीने नांदणी येथील दरोडय़ासह मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन आणि कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशात या टोळीच्या नावावर ३२ गुन्हे नोंद असल्याचे पोलीस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button