INS विक्रमादित्यवर आगीत नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू, भारताची सर्वात मोठी युद्धनौका

आयएनएस विक्रमादित्यवर लागलेली आग विझवताना शुक्रवारी एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. डी.एस.चौहान असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. ते लेफ्टनंट कमांडर होते. आयएनएस विक्रमादित्य ही भारताची एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे. आयएनएस विक्रमादित्य कर्नाटकातील कारवार बंदरात प्रवेश करत असताना ही घटना घडली. युद्ध नौकेच्या एका कक्षामध्ये ही आग भडकली होती.
आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत असताना डी.एस. चौहान यांचा मृत्यू झाला. आघाडीवर राहून त्यांनी नेतृत्व केले असे नौदलाकडून सांगण्यात आले. आग नियंत्रणात आणल्यानंतर धुरामुळे चौहान यांची शुद्ध हरपली. त्यांना तात्काळ कारवार येथील नौदलाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण तेथे त्यांचा मृत्यू झाला.
जहाजाच्या क्रू ने तात्काळ पावले उचलत आग अन्यत्र पसरु न देता नियंत्रणात आणली असे नौदलाकडून सांगण्यात आले. नौदलाने या आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारताने २.३ अब्ज डॉलर मोजून रशियाकडून ही विमानवाहू युद्धनौका विकत घेतली आहे. भारताने आपल्या गरजेनुसार या विमानवाहू युद्धनौकेमध्ये काही बदल केले आहेत. आयएएस विक्रमादित्य २८४ मीटर लांब असून ५६ मीटर उंच आहे. ४० हजार टन वजनाची भारतीय नौदलाकडील ही सर्वात मोठी युद्धनौका आहे.