breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘फडणवीसांनी कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी केले याची चौकशी करा’

मुंबई – रेमडेसिविरच्या साठेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या  संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी रात्रीच पोलीस स्टेशन गाठलं आणि संताप व्यक्त केला. पोलिसांनी यावेळी त्यांना फक्त चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं. दरम्यान काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी रेमडेसिवीर खरेदी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दिग्विजय सिंग यांनी ट्विट केलं असून हा अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचं म्हटलं आहे.

दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत म्हटलं की, “खरं तर फडणवीसांनी कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी केले याची चौकशी झाली पाहिजे. तसंच कोणाच्या परवानगीने केले याचीही चौकशी झाली पाहिजे. ही अत्यंत लाजिरवणी बाब आहे”.

१२ एप्रिलला भाजपा नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना ५० हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजपा नेत्यांनी सांगितले होते.

रविवारी नेमकं काय झालं –
दमण येथील ब्रूक फार्मा या औषध उत्पादक कंपनीकडे ६० हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ब्रूक फार्मा कंपनीचे संचालक राजेश डोकनिया यांना त्यांच्या कांदिवलीतील निवासस्थानावरून ताब्यात घेतले. हा साठा परदेशात निर्यात केला जाणार होता. मात्र भारत सरकारने निर्यातीवर बंदी घातल्याने तो पडून होता. सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठय़ा प्रमाणात तुडवडा आहे. अपुऱ्या पुरवठय़ामुळे सर्वसामान्यांना हे औषध मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. या औषधाचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमी वर रेमडेसिविरच्या ६० हजार इंजेक्शनचा साठा केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी डोकनिया यांची चौकशी सुरू केली होती. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथकही चौकशीसाठी बीकेसी पोलीस ठाण्यात हजर होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

डोकनिया यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सर्वप्रथम विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल झाले. डोकनिया यांना पोलीस बीकेसी पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याची माहिती मिळताच फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार पराग अळवणी, प्रसाद लाड आणि कार्यकर्त्यांसह बीकेसी पोलीस ठाण्यात गेले.

भाजप नेते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. चौकशीनंतर शनिवारी मध्यरात्री डोकनिया यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली. परंतु डोकनिया यांना गरजेनुसार पोलीस बोलावतील तेव्हा चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. डोकनिया यांनी रेमडेसिविरचा साठा का केला होता, याची चौकशी सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button