breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

शाई फेक प्रकरण : ‘‘आंदोलक’’ नगरसेविका आशा शेंडगे यांच्या पाठीशी भाजपा

  • भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची ठाम भूमिका
  • ‘त्या’ आंदोलनाला पाठिंबा नाही, पण कुटुंबप्रमुख म्हणून शेंडगे यांच्या पाठिशी

पिंपरी । प्रतिनिधी

रस्ते खोदाईच्या प्रश्‍नावर नगरसेविका आशा शेंडगे यांनी आक्रमक भूमिका घेत आयुक्‍तांच्या नामफलकावर शाई फेक केली. त्यानंतर त्यांच्यासह दहा महिलांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर त्यांना भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा मिळत नसल्याचे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र नगरसेविका शेंडगे यांच्या पाठीमागे पक्ष असल्याची भूमिका भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी मांडली. आमदार लांडगे पुढे सरसावल्याने शेंडगे प्रकरणी सुरू असलेल्या चर्चांना आता पुर्ण विराम मिळाला आहे.

ऐन सणासुदीच्या काळात महापालिकेकडून विकासकामाच्या नावाखाली रस्त्यात खोदाई केली. त्याचा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. संथ गतीने झालेले हे काम त्वरीत करण्याची भूमिका नगरसेविका आशा शेंडगे यांची होती. ही भूमिका आयुक्‍तांसमोर मांडण्यासाठी महिलांसह त्या महापालिकेत दाखल झाल्या. मात्र आयुक्‍त राजेश पाटील यांनी भेट टाळल्याचा आरोप करत संतप्‍त झालेल्या नगरसेविका आशा शेंडगे यांनी आयुक्‍तांच्या नामफलकावर शाई फेक केली. त्यानंतर त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांच्या आंदोलनाचा मार्ग चुकला असल्याच्या प्रतिक्रिया शहरातील नागरिकांसह, भाजपामध्ये केल्या जाऊ लागल्या. त्यांचे समर्थन केले जाणार नसल्याच्या प्रतिक्रिया देखील व्यक्‍त होऊ लागल्या. त्यांच्या अटकेनंतर पक्षाने ठामपणे त्यांच्या बाजुने भूमिका घेतली नसल्याच्या चर्चा केल्या जाऊ लागल्या. मात्र या प्रकरणावर आता शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनीच पडदा टाकला आहे. आमदार लांडगे यांनी आशा शेंडगे यांच्या बाबत आपली भूमिका स्पष्ट करत या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शेंडगे या लोकांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधी आहेत. सर्वसामान्य लोकांची रोजच्या अडीअडचणीला कायम तत्परतेने उभे राहण्याचे काम गेले १२-१५ वर्षे ते व त्यांचे कुटुंब करत आहे. गणपतीच्या सणासुदीच्या काळात खड्डे खोदाई करु नये, अशी माफक अपेक्षा त्यांची महापालिका प्रशासनाकडून होती. प्रशासनाने सामंजस्याने सदर गोष्ट हाताळणे गरजेचे होते. करोनाच्या महामारीमध्ये सर्व विकास कामांमध्ये दीड वर्षे उशिर झाला आहे, गणपतीच्या दहा दिवसांमध्ये एवढा मोठा फरक पडला नसता. मात्र, तरीही रस्ते खोदाई केली. त्यावर शेंडगे यांनी आक्रमक आंदोलन केले. त्याला समर्थन नसले तरी पक्ष म्हणून त्यांच्या पाठिशी असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले.

शेंडगे यांच्यावरच अन्याय का ?

लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यामध्ये विकासकामांवरून सातत्याने वादाचे खटके उडतात. शहरातील वाढत्या जलपर्णीविरोधात शिवसेना शहरप्रमूख सचिन भोसले यांनी अतिरिक्‍त आयुक्‍त विकास ढाकणे यांना जलपर्णीचा हार घालण्याचा प्रयत्न करत आंदोलन केले. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी देखील विविध प्रश्नांवरून अधिकाऱ्यांच्या खुर्चीला लावली. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी आक्रमक होतात. त्याच पद्धतीने शेंडगे आक्रमक झाल्या. मात्र केवळ त्यांच्यावरच कारवाई करून अन्याय का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

****

नगरसेविका आशा शेंडगे यांनी केलेल्या शाई फेकीचे समर्थन मी व भारतीय जनता पार्टी करणार नाही. परंतु, प्रशासनाने सदर विषय योग्य पद्धतीने हाताळला असता तर एका लोकप्रतिनिधीसोबत दहा सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांना सणासुदीच्या काळात १०-१५ दिवस जेल मध्ये काढावे लागले नसते. आशा शेंडगे व बाकी सर्व १० जणांसोबत मी व भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी राहील. या आधी सुद्धा प्रशासन व नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांचे वाद झाले आहेत पण प्रशासनाने कधीच एवढी टोकाची भूमिका घेतली नाही. आयुक्त साहेबांनी लोकप्रतिनिधीच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे.

– महेश लांडगे, आमदार तथा शहराध्यक्ष,
भारतीय जनता पार्टी. पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button