breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

कौशल्य शिक्षणासाठी ‘इन्फोसिस’ची मदत; राज्यातील ४० लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाभ

मुंबई |

राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्यआधारित शिक्षण मिळावे आणि त्यांची रोजगारक्षमता वाढावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘इन्फोसिस’ कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची माहिती दिली.

इन्फोसिसच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर)अंतर्गत विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे ३,९०० हून अधिक ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केले असून ते कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड या ऑनलाइन मंचावर उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क आणि औपचारिक अभ्यासक्रमासोबत उपलब्ध असतील. पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि रत्नागिरी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत १,६०० महाविद्यालयांतील १० लाख विद्यार्थ्यांना आणि उच्चशिक्षण संचालनालयाअंतर्गत तीन हजार महाविद्यालयांतील ३० लाख विद्यार्थ्यांना अशा एकूण ४० लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यांना इन्फोसिस स्प्रिंग बोर्डचे ३,९००हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध होतील आणि सोबतच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र मिळेल. इन्फोसिसच्या म्हैसूर येथील इन्स्टिटय़ूटमध्ये संबंधित प्राध्यापक, अधिकारी यांच्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

  • उपक्रमाची वैशिष्टय़े…

या मंचावरील कृतिप्रवण अध्ययनामुळे रोजगारासाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्ये विकसित करून रोजगारक्षमता वाढविण्यासाठी मदत होईल. तसेच औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व व्यावसायिक रोजगारविषयक कौशल्ये प्राप्त होतील. शिक्षकांनाही सर्व अभ्यासक्रम वापरता येतील. याद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्याचीदेखील सुविधा उपलब्ध आहे. रत्नागिरीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि नागपूरची शासकीय विज्ञान संस्था यांसाठी खास तयार केलेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना वरील सर्व सुविधांसोबतच प्रोजेक्ट इंटर्नशिप आणि एलएमएसची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे.

  • होणार काय?

’इन्फोसिस पहिल्यांदाच अशा प्रकारचा करार करत आहे. यामुळे जवळपास ४० लाख विद्यार्थी आणि एक लाख प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना फायदा होणार आहे. ’हे शिक्षण इन्फोसिसकडून पूर्णपणे मोफत असून याचा राज्य शासनावर आर्थिक भार पडणार नाही, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

  • अभ्यासक्रम कोणते?

संगणकाच्या प्रोग्रामिंग भाषा, क्लाऊड तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तांत्रिक अभ्यासक्रमांसोबतच बिझनेस कम्युनिकेशन, बिझनेस इंग्लिश, अर्थशास्त्र, लेखनकौशल्य, सकारात्मकता, नेतृत्वकौशल्य इत्यादी विषयांचे ऑनलाइन अभ्यासक्रम यात असतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button