breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

#INDvsSL अत्यंत चुरशीच्या सामन्यात श्रीलंकेचा रोमांचक विजय; आज तिसरी लढत

कोलंबो – बुधवारी भारत आणि श्रीलंकेदरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारतावर चार विकेट्सने विजय मिळवला. रोमांचक झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली आहे. अकिला धनंजया आणि वनिंदू हसरंगा या फिरकीपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे श्रीलंकेने भारताला २० षटकात ५ बाद १३२ धावांत रोखले आणि प्रत्युत्तरात २ चेंडू राखत हे आव्हान पूर्ण केले. दरम्यान, कोरोनाची बाधा झालेल्या कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्यामुळे भारताचे अनुभवी क्रिकेटपटू टी-२० मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, नितीश राणा आणि चेतन साकारिया यांना कालच्या सामन्यात टी-२० पदार्पणाची संधी मिळाली. महत्त्वाचे म्हणजे आज लगेच तिसरा आणि अंतिम टी-२० सामना खेळला जाणार आहे. आज रात्री आठ वाजता कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे.

सामन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकत प्रथम भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर पदार्पणाची संधी मिळालेला महाराष्ट्राचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने कर्णधार शिखर धवनसोबत सलामी दिली. पदार्पणात मोठ्या खेळीकडे प्रवास करताना श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने ऋतुराजला यष्टीपाठी झेलबाद केले. ऋतुराजने २१ धावा केल्या. ऋतुराज-शिखरने ४९ धावांची सलामी दिली. ऋतुराज बाद झाल्यानंतर दुसरा पदार्पणवीर देवदत्त पडिक्कल मैदानात आला. त्याने आणि धवनने संघाची धावगती वाढवली. १३व्या षटकात फिरकीपटू अकिला धनंजयाने पहिल्याच चेंडूवर भारताच्या कर्णधाराला माघारी धाडले. धवनने ५ चौकारांसह ४० धावांची खेळी केली. शतकाचा टप्पा ओलांडण्यापूर्वी भारताने देवदत्त पडिक्कलला गमावले. पडिक्कलने २९ धावा केल्या. हसरंगाने त्याला बाद केले. टी-२०मध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा संजू सॅमसनही या सामन्यात ७ धावांवर माघारी परतला. धनंजयाने पुन्हा गोलंदाजीला येत त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्यानंतर भुवनेश्वर आणि नितीश राणाने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना चेंडू सीमारेषेपार पोहोचवण्यात अपयश आले. तर श्रीलंकेकडून अकिला धनंजयाने ४ षटकात २९ धावा देत २ बळी घेतले.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अविष्का फर्नांडोला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने वैयक्तिक ११ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर सदिरा समरविक्रमा, कर्णधार दासुन शनाका, वनिंदू हसरंगा हे एकापाठोपाठ बाद झाले. मग खेळपट्टीवर स्थिरावलेला सलामीवीर मिनोद भानुका ३६ धावा काढून कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. शतकी पल्ला गाठण्याअगोदर श्रीलंकेचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. तरी १७व्या षटकात श्रीलंकेने शतक फलकावर लावले. शतक पूर्ण झाल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने रमेश मेंडिसला माघारी धाडले. मग शेवटच्या दोन षटकात श्रीलंकेला २० धावांची गरज होती. भुवनेश्वरने टाकलेल्या १९व्या षटकात धनंजय डि सिल्वाने केलेल्या फटकेबाजीमुळे श्रीलंकेला १२ धावा मिळाल्या. त्यानंतर २०वे षटक पदार्पणवीर चेतन साकारियाने टाकले. या षटकात दोन चेंडू शिल्लक ठेऊन श्रीलंकेने विजय साकारला. यजमान संघाकडून धनंजय डि सिल्वाने नाबाद ४० धावांची खेळी केली. तर भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक २ बळी घेतले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button