breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#INDvsENG 4th Test: इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य; हमीद, बर्न्स मैदानात

लंडन – भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रंगतदार स्थितीत आली आहे. मालिकेतील चौथा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. रोहित, राहुल आणि पुजाराच्या मोलाच्या योगदानानंतर शार्दुल ठाकूर आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आपल्या दुसऱ्या डावात ४६६ धावा करत इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिले आणि विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान उभारले. याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने काल, चौथ्या दिवसअखेर ३२ षटकांत नाबाद ७७ धावा केल्या. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी २९१ धावांची गरज आहे. भारतीय वेळेनुसार, आज दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल.

चौथ्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. पहिल्या डावात भारताने २० षटकांत अवघ्या ३९ धावांत लोकेश राहुल (१७), रोहित शर्मा (११) आणि चेतेश्वर पुजाराला (४) गमावले. दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने रोहितला बाद केले. ओली रॉबिन्सनने राहुलला पायचित पकडले आणि जेम्स अँडरसनने पुजाराला यष्टीपाठी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. पुजारानंतर भारताने रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी बढती दिली. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. वोक्सने जडेजाला १० धावांवर बाद केले. मग लंचनंतर विराटने आपले अर्धशतक फलकावर लावले. परंतु चांगल्या लयीत दिसणारा विराट रॉबिन्सनचा बळी ठरला. रॉबिन्सनने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. विराटने ८ चौकारांसह ५० धावांची खेळी केली. जडेजा-विराटनंतर अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंतच्या जोडीकडून संघाला सावरण्याच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र दोघेही पुन्हा एकदा अपयशी ठरले. त्यानंतर मुंबईकर शार्दुल ठाकूरने उमेश यादवला सोबत घेऊन ३१ चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकले. दोघांनी अर्धशतकी भागीदारीही फलकावकर लावली. मग ख्रिस वोक्सने शार्दुलला पायचित पकडले, शार्दुलने ३७ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांसह ५७ धावा चोपल्या. शार्दुलनंतर इंग्लंडने १९१ धावांवर भारताचा गाशा गुंडाळला. इंग्लंडकडून वोक्सने चार, तर रॉबिन्सनने तीन बळी घेतले. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर आटोपला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या कर्णधार जो रूटने डेव्हिड मलानसोबत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. परंतु भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने सुरेख चेंडूवर रूटची दांडी गुल केली, रूटला २१ धावा करता आल्या. मलानही उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ३१ धावा केल्या. इंग्लंडचा अर्धा संघ माघारी परतल्यानंतर ओली पोपने सुरुवातीला जॉनी बेअरस्टो आणि नंतर मोईन अलीसोबत भागीदारी रचली. मग सिराजने बेअरस्टोला आणि जडेजाने अलीला बाद केले. तसेच शतकाच्या जवळ पोहोचलेल्या पोपला ८१ धावांवर शार्दुलने बाद केले. पोपने आपल्या खेळीत ६ चौकार ठोकले. पोपनंतर इंग्लंडचा डाव लवकर आटोपणार असे वाटत होते, मात्र ख्रिस वोक्सने ११ चौकारांसह झुंजार अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक तीन बळी घेतले आणि बुमराह व जडेजाला दोन बळी घेता आले.

भारताच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला लोकेश राहुल आणि रोहित शर्माने उत्तम अर्धशतकी सलामी दिली. मात्र भारताच्या ८३ धावा झालेल्या असताना जेम्स अँडरसनने राहुलला यष्टीपाठी झेलबाद केले. राहुलने ६ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावा केल्या. मग रोहितने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या पुजारासोबत शतकी भागीदारी रचली. ६४व्या षटकात रोहितने वैयक्तिक ९४ धावांवर असताना षटकार ठोकत शतक साजरे केले. त्याचे हे भारताबाहेर कसोटीतील पहिलेच शतक ठरले. मग चहापानानंतर पुजाराने आपले ३१वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. मात्र नवा चेंडू घेतल्यानंतर इंग्लंडने ८१व्या षटकात रोहित आणि पुजाराला माघारी धाडले. रॉबिन्सनने या दोघांना झेलबाद केले. रोहितने १४ चौकार आणि एका षटकारासह १२७ आणि पुजाराने ९ चौकारांसह ६१ धावा केल्या. या दोघांनंतर चौथ्या दिवशी कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. मात्र तासाभरात ख्रिस वोक्सने जडेजा (१७) आणि त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेला पायचित पकडले. रहाणेला भोपळाही फोडता आला नाही. मग चांगल्या फॉर्मात असलेल्या विराटला मोईन अलीने वैयक्तिक ४४ धावांवर बाद केले. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या ओव्हर्टनने विराटचा झेल घेतला. विराटने ७ चौकार लगावले. मग लंचनंतर शार्दुल ठाकूर आणि ऋषभ पंतने दमदार भागीदारी केली. शार्दुलने अप्रतिम फलंदाजी करत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. मात्र जो रूटने त्याला बाद केले. शार्दुलने ७ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा पूर्ण केल्या. त्याच्यानंतर ऋषभ पंतही अर्धशतक करून बाद झाला. पंतने ५० धावांच्या खेळीत ४ चौकार ठोकले. तसेच चहापानानंतर उमेश यादवने २५ धावा जोडल्या. मात्र ओव्हर्टनने उमेशला बाद करत भारताचा डाव ४६६ धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडकडून वोक्सला तीन आणि रॉबिन्सन, मोइन अलीला प्रत्येकी दोन बळी मिळाले.

त्यानंतर भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून हसीब हमीद आणि रोरी बर्न्सने अर्धशतकी सलामी दिली. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने ३२ षटकांत नाबाद ७७ धावा केल्या आहेत. हमीद ६ चौकारांसह ४३ आणि बर्न्स २ चौकारांसह ३१ धावांवर नाबाद आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button