breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

भारताचा लसविक्रम! करोनाविरोधी लढ्याला बळ

  • करोनाविरोधी लढ्याला बळ : लसमात्रांचा १०० कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली |

करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटी लसमात्रांचा टप्पा पार करून भारताने गुरुवारी नवा विक्रम नोंदवला. देशाच्या करोनाविरोधी लढ्यातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. देशात यंदा १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर पहिल्या दहा कोटी लसमात्रा देण्यासाठी ८५ दिवस म्हणजे जवळपास तीन महिने लागले होते. २१ जूननंतर या मोहिमेला गती मिळाली. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून जवळपास नऊ महिन्यांच्या कालावधीत गाठलेला हा यशाचा टप्पा मैलाचा दगड ठरला आहे, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिकांसह संपूर्ण देशवासीयांचे अभिनंदन केले. या यशानिमित्त मोदी यांनी गुरुवारी राम मनोहर लोहिया रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन कर्मचारी तसेच काही लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया उपस्थित होते. या कार्यसिद्धीबद्दल मंडाविया यांनी एका ट्वीटद्वारे देशाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाचा हा परिपाक आहे, असेही मंडाविया म्हणाले.

लसीकरण मोहिमेच्या या यशाबद्दल लाल किल्ला येथे एक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. तिथे एका कार्यक्रमात गौरवगीत आणि चित्रफित प्रकाशित करण्यात आली. देशभरात १०० कोटी मात्रांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे स्वागत करणारी, तसेच करोनायोद्धे व आरोग्य कर्मचारी यांनी या संकटाच्या काळात केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन करणारी घोषणा देशभरातील रेल्वे स्थानकांवर करण्यात आली. केंद्र सरकारच्या काही रुग्णालयांवर बॅनर्स लावण्यात आले. काही रुग्णालयांत कर्मचारी व लसीकरणासाठी आलेल्या लाभार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले. अंदमान व निकोबार बेटे, चंडीगड, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, लक्षद्वीप, सिक्कीम, उत्तराखंड आणि दादरा व नगर हवेली ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येला लशीची किमान एक मात्रा मिळाली आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत सर्वात जास्त लसमात्रा देण्यात आल्या असून, त्याखालोखाल महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात व मध्य प्रदेश ही राज्ये आहेत.

आलेख…

  • देशातील १८ वर्षांवरील एकूण लोकसंख्येपैकी ७५ टक्के नागरिकांना किमान एक लसमात्रा देण्यात आली आहे. जवळपास ३१ टक्के नागरिकांना दोन्ही लसमात्रा मिळाल्या आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी (१७ सप्टेंबर) देशात विक्रमी दैनंदिन लसीकरण झाले. या दिवशी देशभरात २.५ कोटी लसमात्रा देण्यात आल्या.
  • देशातील सर्व लसपात्र नागरिकांचे वर्षाअखेरपर्यंत संपूर्ण लसीकरण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. ते गाठण्यासाठी सव्वादोन महिने उरले आहेत. या कालावधीत सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान सरकारपुढे आहे.
  • अठरा वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाच्या हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू आहेत. त्यामुळे मुलांबरोबरच उर्वरित प्रौढांचे लसीकरणाचे लक्ष्य सरकारला गाठावे लागणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button