breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात…”, संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र

मुंबई |

लखीमपूर खेरी प्रकरणामुळे अवघ्या देशातलं राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेचा सर्वच विरोधी पक्षांकडून निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री उशिरा केंद्रीय राज्यमंत्री अमित मिश्रा यांचा पुत्र आशीष मिश्रा याला अटक करण्यात आली. मात्र, या सर्व प्रकरणात भाजपाची भूमिका आणि काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी दिलेला लढा, याविषयी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. सामनामधील आपल्या रोखठोक या सदरामधून संजय राऊत यांनी भाजपावर परखड शब्दांत टीका करतानाच प्रियांका गांधींमध्ये थेट भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते, असं संजय राऊत यांनी या सदरात म्हटलं आहे.

  • “इंदिराजींचे अस्तित्व यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसले”

“उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. ईडी, सीबीआयसारख्या तपासयंत्रणा आज कुणालाही अटका करीत आहेत. पण चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडवण्याचं काम प्रियांका गांधी यांनी केलं. इंदिराजींचं अस्तित्व यानिमित्ताने पुन्हा दिसलं”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

  • “…तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली”

प्रियांका गांधींना सीतापूरमध्ये गेस्टहाऊसवर ठेवण्यात आल्याचा देखील संजय राऊत यांनी निषेध केला आहे. “लखीमपूर खेरी येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी भेटण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवलं. धक्काबुक्की केली. बेकायदेशीररीत्या डांबून ठेवलं. इंदिरा गांधींच्या नातीला, राजीव गांधींच्या कन्येला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना देशानं पाहिलं. प्रियांका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला, त्यांना इंदिरा गांधींचं देशात अस्तित्व आहे आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल”, असं संजय राऊतांनी नमूद केलं आहे.

  • एक दिवस ज्यांनी झाडू घेऊन फोटो काढले…

दरम्यान, या सदरातून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील खोचक टोला लगावला आहे. “प्रियांका गांधींना सीतापूरला जबरदस्ती डांबले. त्या घाणेरड्या जागेत झाडू हातात घेऊन प्रियांका यांनी साफसफाई केली. देशात स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने एक दिवस ज्यांनी झाडू घेऊन फोटो काढले, त्या लाखो फोटोंवर प्रियांका गांधींच्या एका झाडूने मात केली”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

  • “प्रियांका गांधी इंदिराजींची प्रतिकृती आहेत की नाही हे..”

या सदरातून संजय राऊत यांनी प्रियांका गांधींची तुलना इंदिरा गांधींशी केली आहे. “हाथरसपासून लखीमपूर खेरीपर्यंत राहुल आणि प्रियांका त्याच पद्धतीने वागल्या. प्रियांका गांधी इंदिराजींची प्रतिकृती आहेत की नाही हे येणारा काळच ठरवेल. त्या काळाची सुरुवात झाली आहे हे सीतापूरच्या रस्त्यावर प्रियांका यांनी दाखवले. इंदिरा गांधी आणि त्यांची काँग्रेस नको म्हणून १९७७ साली विरोधक एकत्र आले आणि सत्ताधारी काँग्रेसचा पराभव केला. आज सत्तेवर नसलेल्या काँग्रेसचेही इतर विरोधकांना वावडे व्हावे याचे आश्चर्य वाटते”, असं संजय राऊत यांनी नमूद केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button