TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणे

भारतीय संघाने जिंकली मालिका; न्यूझीलंडचा सात विकेट्स राखून केला पराभव

पुणे | विश्वकप 2020 मधील अपयश मागे टाकून आणि विसरून नवीन कर्णधार आणि नवीन कोचच्या मार्गदर्शनाखाली शानदार सुरुवात करताना भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला दुसऱ्या टी-20 सामन्यात 7 गडी आणि जवळपास तीन षटके राखून मोठ्या फरकाने पराभूत करत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.रांची येथे झालेल्या आजच्या दुसऱ्या सामन्यात रोहीत शर्माच्या भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत आधी अचूक गोलंदाजी करून न्यूझीलंड संघाला कमी धावसंख्येवर रोखले आणि नंतर जबरदस्त फलंदाजी करत दणदणीत पराभूत करून सामना आणि मालिकाही खिशात घातली.कर्णधार रोहीत व के एल राहुलची आक्रमक अर्धशतके भारतीय दुसऱ्या डावाची तर अश्विन, अक्षर आणि हर्षल पटेलची अप्रतिम गोलंदाजी हे पहिल्या डावाचे खास वैशिष्ट्ये म्हणता येईल.जयपूर येथील सामन्यात विजयी सलामी दिल्यानंतर आत्मविश्वास बळावलेल्या भारतीय संघाने आज रांची येथील दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी कंबर कसली होती. तर मालिकेतले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी न्यूझीलंड संघही पूर्ण तयारीने लढणार होता. त्यामुळे एक रंगतदार लढतीच्या अपेक्षेने क्रिकेट रसिक या सामन्याकडे पाहत होता. आजच्या सामन्यातही नाणेफेकीचा कौल रोहीतच्या बाजूने पडला आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक बळी मिळवुन सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या हर्षल पटेलला आज भारतीय संघात स्थान मिळाले. योगायोग म्हणजे तो 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा सहावा वयस्कर खेळाडू ठरला. तर आपले सर्वस्व पणाला लागलेल्या किवी संघांने तीन बदल करत सोधी,निशाम आणि मिल्नेला संघात स्थान दिले.

भारतीय आक्रमणाची सुरुवात भुवनेश्वरने केली,तर किवी डावाची सुरुवात मार्टिन गुप्टील व मिचेलने केली.दोघेही आक्रमक अंदाजात खेळू लागले,भुवनेश्वरच्या पहिल्या षटकात 14 तर दीपक चहरच्या षटकात 10 धावा काढून चांगली सुरुवात त्यांनी दिली.या दोघांनी 5 षटकाच्या आतच 48 धावा जोडल्या असतानाच दीपक चहरने मार्टिन ला यष्टीमागे पंतच्या हातून झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले.

त्याच्या जागी आलेल्या आणि पहिल्या सामन्यात चांगला खेळ करणाऱ्या चॅपमनने आजही काही साहसी फटके मारत आपला आत्मविश्वास किती बुलंद आहे ते दाखवले खरे, पण आज अक्षर पटेलने त्याला जास्त वेळ मैदानात थांबू दिले नाही. या दोघांच्या 31 धावांच्या भागीदारीनंतर पटेलने त्याला वैयक्तिक 21 धावांवर राहूलच्या हातात झेल द्यायला लावून आपली पहिली विकेट मिळवली. त्याने केवळ 17 चेंडूतच या धावा ठोकताना 3 चौकार मारले.

एकंदरीतच न्यूझीलंड संघाची आजची सुरुवात आश्वासक आणि आक्रमक असल्याने पहिल्या दहा षटकानंतर दोन बाद 84 अशा चांगल्या स्थितीत किवी संघ होता. त्यामुळेच मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य त्यांना खुणावतही होते. मात्र आपल्या पहिल्याच सामन्यात खेळणाऱ्या हर्षल पटेलने दुसऱ्याच षटकात मिचेलला सुर्यकुमार यादवच्या हातात झेल द्यायला लावून आपला पहिला बळीही मिळवला आणि पाहुण्या संघाला मोठा धक्काही दिला. त्याच्या एक षटक आधीच नवोदित वेंकटेश अय्यरच्या हातुन सुटलेला झेल यामुळे भारतीय संघाला फारसा महाग पडला नाही.

पहिल्या दहा षटकात आक्रमक झालेल्या न्यूझीलंड संघाने नंतरच्या तीन षटकात मात्र केवळ 19 च धावा काढल्या त्या अक्षर आणि हर्षल या पटेल द्वयीच्या किफायतशीर गोलंदाजीमुळे. यातूनच प्रेरणा घेत अश्विन, भुवनेश्वर व हर्षल पटेल यांनी एकेक बळी घेत अठराव्या षटकाखेर न्यूझीलंडची अवस्था सहा बाद 140 अशी करून धावगती रोखली आणि भारतीय संघाला सामन्यात पुन्हा वापसीही करून दिली.

हर्षल पटेलने आपल्या पहिल्याच सामन्यात चांगली गोलंदाजी करताना केवळ चार षटकात 25 धावा देत दोन गडी बाद करून आपले पदार्पण गाजवले.तर अश्विन (19),आणि अक्षर (26)या फिरकी गोलंदाजांनी सुद्धा अतिशय किफायतशीर गोलंदाजी करताना एकेक गडीही बाद केला. त्या तुलनेत अनुभवी भुवनेश्वर व दीपक चाहर मात्र जरा महागडे ठरले. पण एकंदरीतच भारतीय गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीमूळे न्यूझीलंड संघाचा डाव 20 षटकात 153 धावांवर संपुष्टात आला.

पाहुण्या संघाकडून मिशेल व गुप्टील यांनी प्रत्येकी 31 तर ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 34 धावा केल्या. आक्रमक सुरुवात केल्यानंतर मोठी धावसंख्या उभी करून भारतापुढे एक चांगले आव्हान ठेवतील असे वाटत असतानाच भारतीय गोलंदाज एकदम भरात आले आणि त्यामुळे न्यूझीलंड संघाला धावा करणे खुप कठीण होऊन बसले. आज आणखी एक विशेष बाब म्हणजे आज गोलंदाजी केलेल्या प्रत्येक भारतीय गोलंदाजांनी विकेट मिळवली.

सामना आणि मालिका आजच खिशात घालण्यासाठी 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अनुभवी रोहीत आणि के एल राहुलने भारतीय डावाची सुरुवात अतिशय दमदार केली.या दोघांनी आणखी एक अर्धशतकी भागीदारी नोंदवून विजयाचा पायाही जणू रचला.या भागीदारीत खास गोष्ट म्हणजे नेहमी आक्रमक असणाऱ्या रोहित पेक्षा आज के एल राहूल जास्त आक्रमक आणि आकर्षकही खेळत होता. बघताबघता त्याने आपले 16 वे 20/20 मधले अर्धशतकही पूर्ण केले आणि रोहीत शर्मा बरोबर आपली 5वी विक्रमी शतकी भागीदारी सुद्धा नोंदवली. मात्र वैयक्तिक 65 धावा असताना आणखी एक उत्तुंग षटकार मारण्याची घाई त्याला नडली आणि तो सौदीच्या गोलंदाजीवर फिलिप्सच्या हातात झेल देवून बाद झाला. पण त्याने रोहीत बरोबर पहिल्या गड्यासाठी 117 धावांची बहुमूल्य सलामी रचली.

राहूलचा धडाका बघून रोहीत सुद्धा रंगात आला.आणि त्याने आपल्या चिरपरिचित आक्रमक अंदाजात फलंदाजी करताना केवळ 35 चेंडुत आपले 25 वे अर्धशतक ते ही शानदार षटकार मारत पूर्ण केले. ज्यामध्ये पाच षटकार सामील होते आणि केवळ एकच चौकार. रोहीत आणि कोच राहुलने आज आणखी एक चांगले काम केले ते म्हणजे राहुल बाद झाल्यानंतर नवोदित वेंकटेश अय्यरला सूर्यकुमारच्या आधी फलंदाजीसाठी पाठवून नवोदित खेळाडूंना फुल सपोर्ट केला जाईल हे सप्रमाण सिद्ध केले. दुर्दैवाने आपले अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर रोहीत लगेचच बाद झाला. त्यालाही कर्णधार साऊदीनेच बाद केले. आणि याच षटकात त्याने सुर्यकुमार यादवला सुद्धा एक धाव असताना त्रिफळा बाद करून सामन्यात रंगत निर्माण केली.

यावेळी भारताला विजयासाठी 24 चेंडूत 17 धावा हव्या होत्या.त्यामुळे विजयाची औपचारिकताच बाकी होती.ती पंतच्या दोन घणाघाती षटकार आणि अय्यरची आक्रमक पण समंजस फलंदाजी यामुळे वेळेआधीच पूर्ण झाली.आणि हंगामी कर्णधार ऐवजी पूर्ण वेळ टी-20 चा कर्णधार झाल्यानंतरच्या पहिल्याच मालिकेत रोहीत शर्माने आपली कर्णधारपदाची सुरुवात शानदार केली आहे.आता मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना रविवारी होणार असून भारतीय संघ तो ही जिंकून मालिका 3.0 अशी जिंकणार का हीच उत्सुकता सर्वाना असणार आहे.

आपल्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करून सर्वानाच प्रभावीत करणाऱ्या हर्षल पटेलला सामन्याचा मानकरी म्हणून गौरवण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button