TOP Newsक्रिडा

भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिका: अश्विन हा हुकमी पर्याय – रोहित

न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील ३-० अशा निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे होते, असे रोहितने सांगितले

कोलकाता | ट्वेन्टी-२० सामन्यातील मधल्या षटकांत संघाला बळींची नितांत आवश्यकता असते. तेव्हा रविचंद्रन अश्विन हा नेहमीच कर्णधाराचा हुकमी पर्याय असतो, अशा शब्दांत भारताचा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्माने त्याची प्रशंसा केली.न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील ३-० अशा निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे होते, असे रोहितने सांगितले. चार वर्षांच्या अंतराने ३५ वर्षीय अश्विनने ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत अश्विनने मधल्या षटकांत प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावांसाठी जखडून ठेवताना मोक्याच्या क्षणी बळीसुद्धा मिळवले.‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये मधल्या षटकांतील डाव महत्त्वाचा असतो. अश्विनसारखा गोलंदाज संघात असतो, तेव्हा तो महत्त्वाच्या फलंदाजांचे अडसर दूर करतो,’’ अशा शब्दांत रोहितने त्याची उपयुक्तता अधोरेखित केली.

ईडन गार्डन्सवर रविवारी भारताने तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर ७३ धावांनी विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, ‘‘दुबईतील पुनरागमनापासून ते आतापर्यंतचा अश्विनचा खेळ हा प्रभावी ठरला आहे. तो एक दर्जेदार गोलंदाज असल्याचे सर्वश्रुतच आहे. गेली अनेक वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये त्याने हे सिद्ध केले आहेच; परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी फारशी वाईट नाही.’’

जयपूर आणि रांचीमध्ये अश्विनच्या गोलंदाजीचे अनुक्रमे ४-०२३-२ आणि ४-०-१९-१ असे पृथक्करण होते. रोहितने अक्षर पटेलच्या गोलंदाजीचेही कौतुक केले.

आम्ही संघात निरोगी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. खेळाडू निडरपणे मैदानावर खेळू शकतील, यासाठी त्यांना बळ देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे रोहितने राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखालील बदलाचे विश्लेषण करताना सांगितले.

कसोटीतील फिरकीच्या आव्हानास सज्ज – सँटनर

कोलकाता : ट्वेन्टी-२० मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतामधील खेळपट्टय़ांवर फिरकीच्या आव्हानासाठी आमचे फिरकी गोलंदाज सज्ज झाले आहेत, असे न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने सांगितले. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा भाग असलेली ही दोन कसोटी सामन्यांची मालिका २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ‘‘कानपूरला होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी आम्ही तयार आहोत. आमच्याकडे काही उत्तम फिरकी गोलंदाज आहेत,’’ असे सँटनर या वेळी म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button