TOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारत-आफ्रिका कसोटी मालिका आता निर्णायक वळणावर…!

अजिंक्य रहाणे (७८ चेंडूंत ५८ धावा) आणि चेतेश्वर पुजारा (८६ चेंडूंत ५३ धावा) या संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडूंनी बुधवारी अर्धशतकी खेळी साकारून स्वत:ची कारकीर्द वाचवण्यासह भारतालाही सावरले. परंतु त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी केल्यामुळे उभय संघांतील दुसरा कसोटी क्रिकेट सामना निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे.

जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स मैदानावर सुरू असेल्या या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा आफ्रिकेने ४० षटकांत २ बाद ११८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात शार्दूल ठाकूरने एडिन मार्करमला (३१), तर रविचंद्रन अश्विनने कीगन पीटरसनला (२८) पायचीत पकडले. कर्णधार डीन एल्गर (खेळत आहे ४६) मात्र एक बाजूने तग धरून असून त्याच्या साथीला रॅसी व्हॅन दर दुसेन ११ धावांवर खेळत आहे. त्यामुळे चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट झाले असूून आफ्रिका उर्वरित १२२ धावा करणार की भारताचे गोलंदाज शिल्लक आठ बळी गारद करून ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

तत्पूर्वी, मंगळवारच्या २ बाद ८५ धावांवरून पुढे खेळताना रहाणे-पुजारा यांनी सर्वस्व पणाला लावले. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १११ धावांची भागीदारी रचून संघाची आघाडी १५० धावांपर्यंत नेली. दोघांनीही नेहमीच्या शैलीत फक्त बचावावर भर न देता चौकार वसूल करण्याबरोबरच एकेरी-दुहेरी धावा काढल्या. पुजाराने कारकीर्दीतील ३२वे, तर रहाणेने २५वे अर्धशतक साकारले.

कॅगिसो रबाडाने दोन षटकांच्या अंतरात अनुक्रमे रहाणे आणि पुजाराला माघारी पाठवले. तर ऋषभ पंत भोपळाही फोडू शकला नाही. रविचंद्रन अश्विनही (१६) फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यामुळे भारताची ६ बाद १८४ अशी अवस्था झाली. अशा वेळी मुंबईकर शार्दूल पुन्हा संघासाठी धावून आला. शार्दूलने अवघ्या २४ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह २८ धावा फटकावल्या. तो बाद झाल्यावर हनुमा विहारीने (नाबाद ४०) तळाच्या फलंदाजांच्या साथीने संघाला २६६ धावांपर्यंत पोहोचवले. आफ्रिककेडून रबाडा, एन्गिडी यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : २०२

’ दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : २२९

’ भारत (दुसरा डाव) : ६०.१ षटकांत सर्व बाद २६६ (र्अंजक्य रहाणे ५८, चेतेश्वर पुजारा ५३; लुंगी एन्गिडी ३/४३, कॅगिसो रबाडा ३/७७)

’ दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : ४० षटकांत २ बाद ११८ (डीन एल्गर खेळत आहे ४६, एडिन मार्करम ३१; रविचंद्रन अश्विन १/१४)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button