breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

अपक्ष फुटले, छोट्या पक्षाचे आमदार फुटले, फडणवीसांनी काय केलं? खासदार संजय राऊतांनी सगळं सांगितलं!

मुंबई : महाविकास आघाडीकडे विजयाचं आवश्यक संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडीला धूळ चारुन तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणले. ऐन निवडणूक काळात फडणवीसांना कोरोनाची बाधा झाली होती. पण त्यांनी शांततेच्या काळात अधिकचा घाम गाळला, त्याचं फळ भाजपला तिसऱ्या जागेच्या विजयी रुपात मिळालं. फडणवीसांचा चाणाक्षपणा, निवडणूक काळात आखलेले डावपेच, भाजपच्या सुयोग्य रणनितीच्या जोरावर तिन्ही जागांवर विजय मिळवला. भाजपने केलेल्या ‘करेक्ट कार्यक्रमा’नंतर संजय राऊत यांनी काहीशी हताश प्रतिक्रिया दिली. “आमच्या सोबत असलेले अपक्ष आमदार फुटले, ते कोण फुटले हे आम्हाला माहिती आहे. पण त्यांना आमिषं दाखवण्यात आली. काहींना केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवण्यात आला”, असा गंभीर आरोप निकालानंतर राऊतांनी भाजपवर केला.

मतदानानंतर ८ तास लागून राहिलेली निकालाची उत्सुकता, मध्यरात्रीचा हायव्होल्टेज ड्रामा, आक्षेपांमध्ये अडकलेली मतं, महाविकास आघाडीची वाढलेली धाकधूक अशा वातावरणात पहाटे पावणे चारच्या आसपास महाराष्ट्रातील ६ जागांचा निकाल जाहीर झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला धूळ चारुन तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणले. फडणवीसांनी साम दाम दंड भेद वापरुन तसेच अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांच्या साहाय्याने महाविकास आघाडीला दणका दिला. विजयासाठी आवश्यक संख्याबळ असतानाही योग्य नियोजनाने मविआच्या स्वप्नांना त्यांनी सुरुंग लावला.

अपक्ष फुटले, कोण फुटले हे ही माहिती आहे-राऊत

“आमच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार म्हणजेच पक्षाचे आमदार फुटले नाहीत तर काही अपक्ष आमदार, काही छोट्या पक्षाचे आमदार फुटले आहेत. त्यांना काही आमिषं दाखवण्यात आली. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील… पण आम्ही उद्या पाहू… निवडणुकीत असं होत असतं…” असं राऊत म्हणाले.

आमच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली

“आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, अनिल परब या सगळ्यांनी उत्तम व्यूव्हरचना केली होती, पण शेवटी आमची एक जागा निसटली. आम्ही मतांचा कोटा ज्याप्रमाणे ठरवला होता, त्यानुसारच सगळं काही झालं. आम्ही दुसऱ्या पसंतीची मतं घेतली नाहीत. त्यात माझं एक मत बाद झालं”

भाजपने जागा जिंकली, पण मी त्यांचा विजय मानत नाही

“भारतीय जनता पक्षाने नक्कीच जागा जिंकली, पण मी त्यांचा विजय मानायला तयार नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक ३३ मतं संजय पवारांना आहेत तर भाजपचे विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं आहेत. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे, हे मान्य आहे. पण भाजपचा दणदणीत विजय झाला, हे चित्र साफ झूट आहे. माझं मत बाद करायला लावलं, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला आलाय विजय?”, असं संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button