breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs SL : भारताने दुसरी वनडे जिंकली! विजयाचा शिल्पकार दीपक चहर

कोलंबो – भारताने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात तीन विकेटने रोमांचक विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकाही खिशात घातली. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला दीपक चहर. त्याने नाबाद 69 धावांची खेळी करत संघाला हातातून निसटलेला सामना जिंकून दिला.

श्रीलंकेकडून मिनोद भानुका आणि अविष्का फर्नांडो यांनी फलंदाजीच्या डावाला सुरुवात केली. या दोघांनी दमदार सलामी देत आठव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. मग मागच्या सामन्यात उत्तम गोलंदाजी कलेला फिरकीपटू यजुर्वेंद्र चहल पुन्हा एकदा भारतासाठी धावून आला. त्याने मिनोद भानुकाला वैयक्तिक ३६ धावांवर बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर याच षटकात चहलने भानुका राजपक्षाला शून्यावर बाद केले. इशान किशनने त्याचा झेल टिपला. त्यानंतर अविष्का फर्नांडोने धनंजय डि सिल्वासोबत भागीदारी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो अर्धशतक केल्यानंतर माघारी परतला. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याला हार्दिक पंड्याकरवी झेलबाद केले. फर्नांडोने ४ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या. त्यानंतर दीपक चहरने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या धनंजय डि सिल्वाला कर्णधार धवनकरवी झेलबाद केले. डि सिल्वाने ३२ धावांचे योगदान दिले. मग चहलने पुन्हा गोलंदाजीला येत श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकालाही तुंबूचा रस्ता दाखवला. शनाकाने १६ धावा केल्या. मधल्या फळीत असालांकाने ६ चौकारांसह ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. मात्र भुवनेश्वर कुमारने त्याला बाद केले. ५०व्या षटकात भुवनेश्वरने दुश्मंता चमिरा आणि लक्षण संदानकनला बाद केले. तर लंकेचा तळाचा फलंदाज चमिका करुणारत्नेने धावांचे योगदान दिल्यामुळे लंकेला पावणेतीनशेचा टप्पा ओलांडता आला. अखेरच्या दोन चेंडूंवर करुणात्नेने दोन चौकार पटकावले यासह त्याने नाबाद ४४ धावांची खेळी केली. तर भारताकडून चहल आणि भुवनेश्वरला प्रत्येकी ३ बळी घेता आले व दीपक चहरने २ बळी घेतले.

त्यानंतर पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने भारताच्या डावाची सुरुवात केली. मागील सामन्याचा सामनावीर ठरलेला पृथ्वी शॉ या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. हसरंगाने त्याचा त्रिफळा उडवला. पृथ्वीला फक्त १३ धावा करता आल्या. त्याच्यानंतर मैदानात आलेला इशान किशनही खास धावा करू शकला नाही. वैयक्तिक एक धाव केल्यानंतर रजिथाने त्याला माघारी धाडले. भारताच्या अर्धशतकानंतर कर्णधार धवनला हसरंगाने पायचित पकडले. धवनने ६ चौकारांसह २९ धावा केल्या. धवननंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. मनीष पांडे आणि सूर्यकुमार यादवने १६व्या षटकात भारताचे शतक फलकावर लावले. मात्र १८व्या षटकात मनीष पांडे धावबाद झाला. शनाकाच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने सरळ चेंडू मारला. हा चेंडू शनाकाच्या हाताला लागून यष्ट्यांवर आदळला. मनीष पांडेने ३ चौकारांसह ३७ धावा केल्या. मनीषनंतर आलेला हार्दिक पंड्या शून्यावर माघारी परतला. मग २७व्या षटकात सूर्यकुमार यादवने आपले पहिले एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक करून तो बाद झाला. संदाकनने सू्र्यकुमारला पायचित पकडले. सू्र्यकुमारने ६ चौकारांसह ५३ धावा केल्या. त्याच्यानंतर कृणाल पंड्या भारताला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. पण तो ३५ धावा काढून बाद झाला. मग दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारने सामन्याचा मोर्चा सांभाळला. कधी एकेरी-दुहेरी धावा, तर कधी आक्रमक फटक्यांच्या जोरावर दीपकने आपले वनडे क्रिकेटमधील पहिले अर्धशतक पूर्ण कले. त्याने ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६९ आणि भुवनेश्वरने नाबाद १९ धावा केल्या. तर लंकेकडून वानिंदू हसरंगाने सर्वाधिक ३ बळी घेतले.

दरम्यान, दीपकने या विजयाचे श्रेय प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिले. तो म्हणाला, ‘राहुल द्रविड यांच्या विश्वासामुळे भारताला विजय मिळवून देऊ शकलो. देशासाठी सामना जिंकण्यापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाही. राहुल सरांनी मला प्रत्येक चेंडू खेळून काढण्याचा सल्ला दिला होता.’

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button