breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND Vs PAK, T20 World Cup 2021: हाय व्होल्टेज सामन्यात भारताचा दारूण पराभव

दुबई – भारत-पाकिस्तान सामना जिंकून विजयी गुलाल उधळण्याची स्वप्न पाहणाऱ्या करोडो भारतीयांची स्वप्न काल चक्काचूर झाली. टी-20 विश्वचषकात रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. खराब फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीमुळे भारताने हा सामना गमावला. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीचे (५७) झुंजार अर्धशतक व्यर्थ ठरले. तर डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या (३/३१) भेदक माऱ्यानंतर मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली.

सामन्याची अत्यंत खराब सुरुवात झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला केवळ 151 धावांचे आव्हान दिले. यावेळी पाकिस्तानच्या शाहीनने सर्व महत्त्वाचे विकेट घेतले. यात रोहित शर्मा, सूर्यकुमार आणि विराटचा समावेश आहे. रोहित शर्मा (०) आणि के. एल. राहुल (३) या सलामीच्या जोडीला शाहीनने स्वस्तात माघारी पाठवले. तसेच सूर्यकुमार यादवही (११) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यानंतर मात्र कोहली (५७) आणि ऋषभ पंत (३९) यांनी पडझड थांबवली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी रचली, मात्र फिरकीपटू शादाब खानने ऋषभला बाद केले. तर कोहलीने ४९ चेंडूत ५७ धावांची खेळी केल्यावर त्याला शाहीननेच माघारी धाडले. त्यामुळे भारताला जेमतेम १५० धावांचा टप्पा पार करता आला. मग भारताने दिलेल्या 152 धावांचे आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. बाबर आझम आणि रिझवान या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके ठोकत सामना पूर्णत्त्वास नेला.

दरम्यान, भारत पराभूत झाला असला तरी विराटने या सामन्यात अर्धशतक झळकावत टी-20 विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकं लगावण्याचा रेकॉर्ड केला आहे. याआधी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने 9 अर्धशतकं लगावली होती. विराटनेही 9 अर्धशतकं लगावली असून आजच्या अर्धशतकासह त्याची टी-20 विश्वचषकात 10 अर्धशतकं झाली आहेत. तसेच भारताने यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकात सात (१९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५, २०१९) आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाच (२००७मध्ये दोन वेळा, २०१२, २०१४, २०१६) सामने जिंकले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button