पिंपरी |
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षांत आकाशचिन्ह परवाना विभागाने तब्बल 12 कोटी 58 लाखांचा महसूल वसूल केला आहे. कोणताही नवीन परवाना न देता जुन्या परवानाधारकांकडील थकबाकी व दंडाची रक्कम वसूल केली आहे. गेल्या दहा वर्षांतील हा उच्चांकी आकडा आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात होर्डिंग्ज उभारून जाहिराती केल्या जातात, असे होर्डिंग्ज महापालिका स्वतःच्या जागेत उभारून व खासगी जागा मालकांना परवानगी देते. त्यासाठी आकाशचिन्ह परवाना विभाग कार्यरत असून, महापालिकेच्या उत्पन्नाचे एक साधन आहे. शुल्क आकारून होर्डिंग्ज उभारण्याची परवानगी दिली जाते.
काही जाहिरातदार व खासगी जागा मालक एका होर्डिंग्जच्या परवान्यावर अनेक होर्डिंग्ज उभारून कमाई करतात. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होऊन महापालिकेचा महसूल बुडविला जातो. काही जण परवाना घेऊन शुल्क भरत नव्हते. जागेचे भाडे देत नव्हते. त्यामुळेसुद्धा महसूल बुडतो. यंदा विभागाने अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर कारवाई करद दंड वसूल केला. थकबाकी वसूल केली. त्यामुळे एक एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत 11 कोटी 58 लाक रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या दहा वर्षातील हा उच्चांकी आकडा आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर, चौकात होर्डिंग्ज, फ्लेक्स लावलेले आहेत. अधिकृतपेक्षा अनधिकृतची संख्या अधिक आहे. शहराचे विद्रूपीकरण करून अनेक जण कोट्यवधींची कमाई करीत आहेत. महापालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. यावर्षी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मागील पाच वर्षातील उत्पन्न
आकाश चिन्ह विभागाचे गेल्या पाच वर्षांतील उत्पन्न तिप्पट झाले आहे. यामध्ये 2017-18 मध्ये 3 कोटी 79 लाख, 2018-19 मध्ये 3 कोटी 98 लाख, 2019-20 मध्ये 6 कोटी 11 लाख, 2020-21 मध्ये 4 कोटी 20 लाख तर 2021-22 मध्ये 12 कोटी 50 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये उत्पन्नात घट झाली होती. मात्र, 2021-22 या आर्थिक वर्षांत आकाश चिन्ह विभागाला घसघशीत असे उत्पन्न मिळाले आहे.
उत्पन्नात पुढे पण कारवाईत मागे
शहरात सध्यस्थितीत 2 हजार 141 मोठे जाहिरात फलक अधिकृत आहे. परवानाधारक फलकांच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत उत्पन्न जमा होत आहे. मात्र, 27 लाख लोकसंख्येच्या शहरात फक्त 2 हजार 141 जाहिरात फलक अधिकृत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात फक्त 118 फलकांवर कारवाई करण्यात आली आहे. आकाश चिन्ह परवाना विभागाचे उत्पन्न दरवर्षी वाढ होताना दिसून येत आहे.
मात्र, अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यामध्ये हा विभाग मागे आहे. शहरात सध्यस्थितीत 2 हजार 141 मोठे जाहिरात फलक अधिकृत आहे. जाहिरात फलक लावण्यासाठी अ क्षेत्रीय कार्यालयात 67, ब मध्ये 86, क मध्ये 27, ड मध्ये 12, इ मध्ये 160 तर फ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत 35 असे 387 अर्ज आहेत. या अर्जावर अद्याप निर्णय झाला नाही.
आकाश चिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले, ”उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जाहिरातदार व जाहिरातीचे स्वरूप आणि सर्वकष धोरण ठरविणे, जाहिरात साधने व संरचना निश्चित करण्यासाठी बाह्य जाहिरात धोरण समिती गठीत करण्यात आली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षांत 11 कोटींचे टार्गेट असताना साडेबारा कोटींचे उत्पन्न मिळाले आहे”.