breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

शिरुरमध्ये खासदार डॉ. कोल्हेंवर आमदार मोहिते, माजी आमदार लांडे नाराज

खासदार डॉ. कोल्हे यांना आत्मचिंतन करण्याची आवश्यकता

अल्पावधीतच डॉ. कोल्हेंविरोधात स्वपक्षातून नाराजी सूर

पिंपरी ।विशेष प्रतिनिधी
शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात स्वपक्षातील नेत्यांनीच नाराजीचा सूर घेतला आहे. त्यामुळे राजकीय जीवनातून वेळ काढून मन:शांतीसाठी ‘चिंतन’करणाऱ्या डॉ. कोल्हे यांना निश्चितपणे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा बँक, दूध संघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा वाकी, संतोषनगर येथे झाला.
यावेळी खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी स्वपक्षाचे खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर निशाणा साधाला आहे. ‘‘तुम्ही स्वत:च्या लोकप्रियतेमुळे नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे खासदार झाला आहात, याचे भान असूद्या, असा इशाराच मोहिते यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे, ‘‘खेड तालुक्यातील निर्णय घेताना विचारात घेत नाही. तालुक्यात परस्पर येऊन कार्यक्रम करता आणि ज्यांनी निवडणुकीत जीवाचं रान करून निवडून आणले, त्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या विरोधकांना बरोबर घेता…हे काही बरं नाही. समाजकारण यू ट्यूब, फेसबुकवर पोस्ट टाकण्यएवढे सोपं नाही. ज्यासाठी तुम्हाला योग्य समजून मते दिली, त्या लोकांचे काम करा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत या! असा बोचरा सल्लाही आमदार मोहिते यांनी दिला. त्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.
अजित गव्हाणेंशी जवळीक अन् लांडे नाराज?
भोसरी विधानसभा मतदार संघात माजी आमदार विलास लांडे यांना बाजुला करुन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांच्याशी जवळीक केली आहे. शहर राष्ट्रवादीची धुरा गव्हाणे यांच्याकडे सोपवण्याबाबत डॉ. कोल्हे आग्रही आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे माजी आमदार विलास लांडे यांची नाराजी असून, गेल्या काही दिवसांपासून भोसरीतील डॉ. कोल्हे यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला लांडे उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे अजित गव्हाणे यांचे कार्यक्रम फेल होताना दिसतात अन् विलास लांडे यांची नाराजी प्रकर्षाने जाणवते.
लोकसभा निवडणुकीचा संदर्भ अन् कोल्हेंचे राजकारण…
आमदार दिलीप मोहिते आणि माजी आमदार विलास लांडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार कार्यरत आहेत. तसेच, डॉ. अमोल कोल्हे हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मर्जीतील आहेत, असे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये विलास लांडे यांना शिरुर लोकसभा मतदार संघातून तिकीट निश्चित केले होते. त्यादृष्टीने लांडे यांनी तयारीही केली होती. मात्र, ऐनवेळी लांडे यांचे तिकीट कापण्यात आले. त्यावेळी लांडे समर्थकांनी भोसरीतून नाराजी व्यक्त करीत डॉ. कोल्हे यांचे काम न करण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी, भोसरीतून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. याची सल डॉ. कोल्हे यांना असल्यामुळेच डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे विलास लांडे यांची नाराजी वाढली. परिणामी, भोसरीतील राष्ट्रवादीत दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button