In Pune, the sloganeering against Raj Thackeray, Vasant More said, Rajsaheb was alive and will remain
पुणे| मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवर भोंग्यांसदर्भात घेतलेल्या भूमिकेशी फारकत घेतल्यामुळे चर्चेत आलेले पुणे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून गच्छंती झाल्यानंतर ते मनसेतून बाहेर पडणार असल्याचीही कुजबूज सुरु आहे. एवढेच नव्हे तर पुण्यातील वसंत मोरे यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. पुण्याच्या कोंढवा परिसरात शुक्रवारी वसंत मोरे समर्थक मुस्लीम समुदायाने एक मोर्चा काढला होता. या मोर्चात ‘राज ठाकरे मुर्दाबाद’, ‘साईनाथ बाबर मुर्दाबाद’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे मनसेच्या गोटात पुन्हा तणाव निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंच्या भाषणानंतर मी माझी भूमिका मांडली. मात्र, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी राजसाहेबांच्या भूमिकेला विरोध केला, असा प्रचार करण्यात आला. काल कोंढवा परिसरात एका मोर्चात ‘राज ठाकरे मुर्दाबाद’, ‘साईनाथ बाबर मुर्दाबाद’, अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणा ऐकून माझ्या मनाला खूप वेदना झाल्या. राजसाहेब हे जिंदाबाद होते आणि कायम जिंदाबाद राहतील, असे वसंत मोरे यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनी समाजात दुफळी माजणार नाही आणि वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देऊ नका, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
वसंत मोरे सोमवारी राज ठाकरेंची भेट घेणार
वसंत मोरे हे सोमवारी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसेचे नेते बाबू वागस्कर हे राज ठाकरे यांचा निरोप घेऊन वसंत मोरे यांच्या घरी गेले होते. त्यांनी वसंत मोरे यांना राज ठाकरे यांचा निरोप दिला. राज ठाकरे यांनी सोमवारी तुम्हाला भेटायला बोलावले असल्याचे बाबू वागस्कर यांनी सांगितले. त्यामुळे आता सोमवारी शिवतीर्थवरील बैठकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.