breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

शिवसेना धक्कातंत्राच्या तयारीत, कोल्हापूरच्या कट्टर शिवसैनिकाचं नाव चर्चेत, संभाजीराजेंना शह?

मुंबई : शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना दिलेला अल्टीमेटम संपला असून आता शिवसेना नेत्यांनी त्यांची पुढची रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्यानुसार पक्षातील कट्टर शिवसैनिक पदाधिकाऱ्यालाच राज्यसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात निर्णय झाला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिरुरचे माजी खासदार आढळराव पाटील, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तसंच चौथं आश्चर्यकारक नाव म्हणजे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार यांची नावे राज्यसभेसाठी चर्चेत आहेत.

आज दुपारी १२ वाजता वर्षावर येऊन शिवबंधन बांधा, आम्ही तुमची उमेदवारी जाहीर करु, अशी ऑफर शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींना दिली होती. मात्र सेनेची ऑफर धुडकावून संभाजीराजेंनी सकाळीच मुंबईहून कोल्हापूरकडे प्रयाण केलं. आपण अपक्ष लढण्यावर ठाम आहोत, असे संकेतच त्यांनी आपल्या कृतीतून दिले. संभाजीराजेंच्या ठाम भूमिकेनंतर आता शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. सहाव्या जागेवर शिवेसेनेचाच उमेदवार जिंकून येणार, आम्ही कुणाही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन शिवसेनेने एकप्रकारे संभाजीराजेंचा प्रश्न निकाली काढला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात कोणत्या नावांवर खलबतं सुरु आहे, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिरुरचे माजी खासदार आढळराव पाटील, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि संजय पवार यांची नावे प्रामुख्याने चर्चेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी लोकसभेला पराभूत झालेल्या २ सेना नेत्यांची नावे चर्चेत आहेत. चंद्रकांत खैरे, आढळराव पाटील यांचं राजकीय पुनर्वसन शिवसेनेला करायचे आहे. जर संभाजीराजे शिवसेनेत यायला उत्सुक नाहीत तर अशावेळी या दोन नेत्यांचा विचार प्रामुख्याने होऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं. तसेच संजय राऊत यांच्या खांद्याला खांदा लावून दिल्लीत हिंदुत्वाचा आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करणारी ही दोन नावे आहेत. त्यामुळे ही दोन नावे शिवसेनेच्या टॉप लिस्टमध्ये आहेत, असं सांगितलं जातंय.

उर्मिला मातोंडकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसची साथ सोडत सेनेचा भगवा हाती घेतला. त्यानंतर लगोलग सेनेने त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावायची ठरवली. १२ आमदारांच्या यादीत त्यांचंही नाव समाविष्ट केलं. पण राज्यपाल कोश्यारींनी आणखी कोणताही निर्णय न घेतल्याने १२ आमदारांची फाईल आणखीही तशीच आहे. त्यामुळे मातोंडकर यांच्या नावापुढे आणखी काही आमदारकी लागली नाही. आता राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी त्यांचंही नाव चर्चेत आहे.

राज्यसभेसाठीचं चौथं आणि आश्चर्यकारक नाव म्हणजे कोल्हापूरचे संजय पवार… कोल्हापुरातील शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. गेली २५ ते ३० वर्ष त्यांनी शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून काम केलंय. त्यांच्यावर सध्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी आहे. पक्षाने यंदा ग्रामीण भागातील शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवायचं ठरवलं आहे. त्यामुळे पवारांच्या नावाची चर्चा होतीये. त्याचं कारणंही खास आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारल्यात जमा आहे. छत्रपती संभाजीराजेंना शह देण्याासाठी कोल्हापुरातीलच सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी देण्याचा विचार शिवसेनेमध्ये आहे. त्याच दृष्टीकोनातून संजय पवार यांच्या नावाची चर्चा आहे.

बरं शिवसेनेला धक्कातंत्राचा इतिहास देखील आहे. याअगोदरही राज्यसभा उमेदवारी देताना फार काही निकष न लावता त्या त्यावेळी योग्य वाटेल ते नाव शिवसेना देते. अगदी अमराठी व्यक्तीलाही शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. आता तर संभाजीराजेंनी ऑफर धुडकावल्यानंतर शिवसेनेसमोर उमेदवारी कुणाला द्यावी, असा प्रश्न असताना कट्टर शिवसैनिकाला आणि त्यातल्या त्यात राजे विरुद्ध सर्वसामान्य नागरिक असा मेसेज देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यातूनच संजय पवार यांचं नाव चर्चेत आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button