breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला ‘गळती’ : राष्ट्रवादीचे प्रवक्ते विनायक रणसुभे यांचा शरद पवार गटात प्रवेश! 

लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर इच्छुकांच्या हाती ‘तुतारी’ : शहरातील राजकीय चित्र बदलणार; शहराध्य तुषार कामठे यांचा दावा

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला ‘गळती’ सुरू झाली आहे. आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी आता हातात ‘तुतारी’ घेण्याची भूमिका घेतली आहे. 

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते विनायक रणसुभे यांनी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते. 

राजकीय रणनितीकार आणि फर्डे वक्ते अशी विनायक रणसुभे यांची ओळख आहे. तसेच, ते अजित पवार गटातील माजी आमदार विलास लांडे यांचे निकटवर्ती आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणून कार्यकाळ गाजवला आहे. रणसुभे यांच्या मागे आता लवकरच आणखी काही स्थानिक नेते शरद पवार गटात प्रवेश करतील, असा दावा केला जात आहे. 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत खरी राष्ट्रवादी कोणाची? याचे उत्तर मतदारांनी दिले आहे. शरद पवार साहेबांच्या विचारांवर आणि नेतृत्त्वावर विश्वास ठेवून अनेकजण आगामी काळात पक्षात प्रवेश करतील. आता विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे. ‘जनाधार’ हा शरद पवार साहेबांच्या पक्षाला आहे.  त्यामुळे आगामी काळात शहरातील राजकीय चित्र बदललेले पहायला मिळेल. 

अजित पवार गटातील दिग्गज वेगळ्या विचारात…! 

लोकसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये शिरुर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे यांच्या विरोधात अजित पवाट गटातील काही नेत्यांनी छुप्या पद्धतीने काम केले. तसेच, भोसरी मतदार संघात काहीजणांनी ‘तुतारी’ चालवली,  असा दावा केला जातो. राज्य पातळीवर शरद पवार गटाला मिळालेले यश पाहता आणि मतांची आकडेवारी पाहता पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिग्गज नेते अजित पवार गटाला रामराम ठोकणार आहेत. कारण, महायुतीच्या जागावाटपामध्ये चिंचवड आणि भोसरीवर भाजपा दावा करणार असून, पिंपरी मतदार संघात विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचा दावा राहणार आहे. परिणामी, विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या दिग्गजांना शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे गटाचा विचार करावा लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button