breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

इम्तियाज जलील यांची राष्ट्रवादीला ऑफर; छगन भुजबळ म्हणतात, “नक्कीच पवार साहेब…”

मुंबई  |

भाजपाला हरवण्यासाठी एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची नुकतीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत चर्चा झाली, या चर्चेत त्यांनी ही युतीची ऑफर दिली आहे. जलील यांच्या या ऑफरची आज सकाळपासून चांगलीच चर्चा आहे. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आज निफाड तालुक्यातील लासलगाव येथे एका कार्यक्रमाला आले होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीचं हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. २०२४मध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास भाजपाने महाराष्ट्राची सत्ता विसरावी, असा टोला त्यांनी लगावला.

महाविकास आघाडीतील २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही आमदार नाराज आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर भुजबळ म्हणाले की, “उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सोनिया गांधी यांच्या आघाडीचे सरकार निश्चितपणे पाच वर्षे टिकणार आहे. पाच वर्षानंतर हे तीन पक्ष एकत्रित लढले तर भाजपाने महाराष्ट्रातील सत्ता विसरायला हरकत नाही,” असा टोला भुजबळांनी लगावला. तर, “इम्तियाज जलील एमआयएमचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत आले, तर त्यांना पक्षात घ्यायला काहीच हरकत नाही. त्यांनी राष्ट्रवादीच्या धोरणाप्रमाणे काम करावं, नक्कीच पवार साहेब त्यांना राष्ट्रवादीत घेतील,” असे भुजबळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button