breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

कारभार सुधारा अन्यथा महावितरणला टाळे ठोकणार!

  •  भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांची तंबी

पिंपरी । प्रतिनिधी

भोसरी गावठाण आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून वीज समस्या वाढली आहे. व्यावसायिक, गृहिणी आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरण प्रशासनाने तात्काळ कारभार सुधारावा, अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.

याबाबत आमदार लांडगे यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रातील १०० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यामुळे भोसरी व आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागांमध्ये वीज नाही. याबात महावितरण प्रशासनाकडे तक्रार करुनदेखील समस्या सोडवण्यात अपयश येत आहे. शहरातील विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने पर्यायी वीजपुरवठ्याची सोय देखील उपलब्ध होऊ शकलेली नाही. याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.

भोसरीमधील गवळी माथा येथे महापारेषण कंपनीचे तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. एक पॉवर ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरद्वारे महावितरणच्या एकूण २६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. बुधवारी सकाळी पुन्हा आणखी एक ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या एकूण १० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी, भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

  • पिंपरी- चिंचवडकर महाविकास आघाडी सरकारला धडा शिकवतील : आमदार लांडगे

पिंपरी-चिंचवड शहरातील वीज समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. उर्जा मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा करुनही महावितरण संदर्भातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावली जात नाही. २०१९ पासून राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील वीज पुरवठ्याबाबत प्रस्तावित कामे रखडली आहेत. या विभागाकडे पुरेसा निधीही उपलब्ध नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी- चिंचवडकर महाविकास आघाडीला धडा शिकवतील, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button