Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

आनंद दिघेंसोबत घडलेल्या घटना मी पाहिल्यात, जास्तीचं बोलाल तर मी माझं तोंड उघडेल : एकनाथ शिंदे

मुंबई : “धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत जे घडलं, त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांच्यासोबत घडलेल्या घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. त्यांच्यावर ओढावलेले प्रसंग देखील मी पाहिले आहेत. याविषयी मी आज काही बोलणार नाही. पण जेव्हा समोरुन तोंड उघडलं जाईल, तसं मला देखील त्या गोष्टींवर बोलावं लागेल”, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. “अन्यायाविरोधात पेटून उठा, हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलंय. त्यांचा मी शिष्य आहे. तेव्हा जास्तीचं बोलाल तर दिघेसाहेबरोबर काय काय घडलं, हे मी उघड करेन”, असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. बंडखोर नेते, माजी मंत्री दादा भुसे यांच्या मालेगावात मुख्यमंत्री शिंदे यांनी सभा घेत मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सेना नेत्यांवर जोरदार टीका केली. “आमच्या माथ्यावर गद्दारीचा शिक्का मारला जातोय. पण आम्ही गद्दार नाही. आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची शिकवण घेऊन पुढे चाललोय. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर कधी युती करणार नाही, तशी वेळ आली तर आम्ही आमचं दुकान बंद करु असं बाळासाहेब म्हणाले होते”, असा पुनरुच्चारही एकनाथ शिंदे यांनी केला.

“आनंद दिघे यांनी त्यांचं आयुष्य शिवसेनेसाठी वाहून घेतलं. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत त्यांनी शिवसेना वाढीसाठी काम केलं. पण त्यांच्याबाबतीत खूप राजकारण झालं. धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत जे घडलं, त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांच्यासोबत घडलेल्या घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. त्यांच्यावर ओढावलेले प्रसंग देखील मी पाहिले आहेत. मी ज्यादिवशी माध्यमांना मुलाखत देईन, त्यादिवशी राज्याच्या राजकारणात भूकंप होईल. सध्या मी काही बोलणार नाही. पण समोरुन जर तोंड उघडलं गेलं तर मी पण शांत बसणार नाही”, असा इशारा देतानाच मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बंड करुन पेठून उठा हीच त्यांची शिकवण असल्याचं एकनाथ शिंदे सांगायला विसरले नाहीत.

“ज्यांच्यासोबत लढलो, त्यांच्याविरोधात जाऊन मुख्यमंत्रिपदासाठी वेगळी भूमिका घेतली. मुख्यमंत्रीपदासाठी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी कधी तडजोड केली नाही, त्यांनी विचारांशी कधी प्रतारणा केली, असं सांगतानाच उद्धव ठाकरे आणि माझ्यातील ज्या गोष्टी आहेत, त्या मी आज सांगणार नाही. मात्र एक दिवस मलाही तोंड उघडावे लागेल, मलाही भूकंप करावा लागेल. मी कधीही कोणावर खालच्या भाषेत बोलत नाही, मात्र अन्याय झाला तर सहन करणार नाही”, असा इशारा ठाकरेंना दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button