breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमुंबईराजकारण

“फेसबुक, ट्विटरवर बंदी घातली तर भक्तमंडळ आनंदसोहळा कसे साजरा करणार?,” शिवसेनेचा टोला

मुंबई |

हिंदुस्थानातील कोरोना मृतांचे खरे आकडे लपवले जात असल्याची बोंब जागतिक पातळीवर मारली जात आहे. ही बोंब मारण्यासाठी कुणीतरी ‘ट्विटर’चे माध्यम वापरले म्हणून मध्यरात्री दिल्लीच्या ‘ट्विटर’ मुख्यालयावरच पोलिसांनी धाडी घातल्या. आता या समाज माध्यमांवरही बंदी घालण्याचे विचार सुरू आहेत. आम्हाला वाटते, थोडे थांबायला हवे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍपवर अशी घाईघाईने बंदी घातली तर मेहुल चोक्सीला पकडल्याचा व हिंदुस्थानात आणल्याचा आनंदसोहळा भक्तमंडळ कसे साजरा करणार? असा टोला शिवसेनेने सामना संपादकीयमधून लगावला आहे. “मेहुल चोक्सी कोण व त्याचे काय झाले याबाबत आपल्या देशातील सामान्य जनतेला काही पडलेले नाही. तरीही ‘डॉमिनिकन’ देशांत कुठेतरी चोक्सीला बेडय़ा ठोकल्याचा आनंद उत्सव आपल्या देशात साजरा केला जाईल.

पंजाब नॅशनल बँकेच्या 14 हजार कोटींच्या घोटाळय़ातील मेहुल हा एक आरोपी आहे. मुख्य आरोपी नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात आहे. त्यालाही परत आणण्यासंदर्भात लंडनच्या कोर्टात न्यायालयीन लढाई सुरू आहे. दुसरे एक महाशय विजय मल्ल्या यांनीही स्टेट बँकेसह अनेक वित्तीय संस्थांना आठ-दहा हजार कोटींचा गंडा घातला असून श्रीमान मल्ल्या हेदेखील लंडनच्या रस्त्यावर फिरत आहेत. मल्ल्या यांनाही देशात आणण्यासाठी लंडनच्या कोर्टात झगडा सुरू आहे. मोदी, मेहुल चोक्सी यांच्यासारखे अनेक लोक गेल्या काही वर्षांत देश सोडून पळाले आहेत. आयपीएल क्रिकेट सोहळय़ाचे कर्तेसवरते ललित मोदी हेसुद्धा आर्थिक घोटाळय़ांच्या आरोपांमुळे पळून गेले आहेत व युरोपातील देशात त्यांचा वावर मस्त सुरू आहे. त्यांचा कोणी ‘बालही बांका’ करू शकलेले नाही. नीरव मोदी, चोक्सी, मल्ल्या हे तर भाजप सरकारच्या काळातच पळून गेले आहेत. कोणीतरी आतून मदत केल्याशिवाय त्यांना असे पळून जाणे शक्य आहे काय?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

“यापैकी प्रत्येक जण सांगतोय, ‘‘आम्ही प्रखर राष्ट्रभक्त असून कोणताही घोटाळा हा जाणीवपूर्वक झालेला नाही. आम्ही सिस्टमचे व राजकारणाचे बळी आहोत.’’ मल्ल्या यांनी तर बँकांचे पैसे परत करण्याचे ‘प्लॅन’ही दिले. मल्ल्या, मोदी वगैरेंची संपत्ती जप्त केली गेली आहे. मल्ल्या यांचे म्हणणे असे की, त्यांनी बुडविलेल्या कर्जापेक्षा त्यांच्या जप्त केलेल्या संपत्तीची किंमत जास्त आहे. पळून गेलेल्या प्रत्येक उद्योगपतीचे म्हणणे असेही आहे की, हिंदुस्थानातील माहोल व्यापार-उद्योग करण्यालायक राहिलेला नाही. मल्ल्या वगैरे लोक आज आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावर कोण विश्वास ठेवणार? मात्र एकेकाळी या सर्व भगोडय़ांचे देशाच्या ‘जीडीपी’त महत्त्वाचे योगदान होतेच. हिरे व्यापाऱ्यात नीरव मोदीचे नाव मोठेच होते. तसे मद्य, स्पिरिट, हवाई वाहतूक क्षेत्रांत मल्ल्याने उंच झेप घेऊन नागरी हवाई उड्डाण व्यवसायाला नवी दिशा दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती याच काळात इतक्या वाढल्या की, विमान कंपन्या साफ कोसळून गेल्या. नरेश गोयल यांच्या ‘जेट’ विमान कंपनीनेही प्राण सोडला. यापैकी अनेक विमान कंपन्यांना जगवता आले असते, पण वेळीच प्राणवायू मिळू दिला गेला नाही. कोणाच्या तरी राजकीय वरदहस्ताखाली चालणाऱ्या विमान कंपन्यांना बळ देण्यासाठीच या जुन्याजाणत्या विमान कंपन्यांना कोंडीत पकडून उतरविण्यात आले व भंगारात ढकलले गेले असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. यातून विमान वाहतूक क्षेत्राला आर्थिक फटका तर बसलाच, पण बेरोजगारीचे संकटही निर्माण झाले,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“मल्ल्या, नीरव, चोक्सी वगैरे बाजूला ठेवा, पण देशातील किमान 10 हजारांवर कोटय़धीश उद्योगपती, व्यापारी मंडळींनी गेल्या सात वर्षांत ‘स्वदेश’ सोडून इतर देशात जाऊन बस्तान बसवले आहे. यात अनेक जणांची गणना नामवंतांत होते व त्यांनी कोणताही आर्थिक घोटाळा केलेला नाही, पण देशाचा आर्थिक व औद्योगिक मोहोल ठीक नसल्याचे कारण देत ते शांतपणे निघून गेले. हे सत्य असेल तर गाजावाजा केलेल्या ‘स्टार्टअप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ वगैरे खेळांचा काय निकाल लागला? नवे उद्योग, नवी गुंतवणूक आलीच नाही. उलट जी होती तीसुद्धा गेली,” अशी टीका शिवसेनेने केली आहे. “अनेक सार्वजनिक उपक्रम, जे पंडित नेहरूंच्या काळात मेहनतीने उभारले गेले, ते सर्व उद्योग विकले जात आहेत किंवा नव्या ईस्ट इंडिया कंपनीला चालवायला दिले गेले आहेत. एअर इंडियाचा बाजार जाणीवपूर्वक उठवला गेला. भारतीय रेल्वे भविष्यात आपली राहणार नाही. तेल कंपन्यांचे सौदे पडद्यामागून सुरू आहेत. बाजूची चीन, बांगलादेशसारखी राष्ट्रे त्यांचे ‘जीडीपी’, दरडोई उत्पन्न वाढवत आहेत, पण हिंदुस्थानात कोरोनामुळे ‘डोकी’ कमी करण्याचा खाटीकखाना उघडला आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button