breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

“ते पाहून मला धक्काच बसला…,” ओमायक्रॉनचा सर्वात प्रथम शोध लावणाऱ्या दक्षिण अफ्रिकेतील शास्त्रज्ञाचा खुलासा

नवी दिल्ली |

करोनाचं संकट लवकरच टळेल अशी अपेक्षा असतानाच नव्या विषाणूने पुन्हा एकदा जगावर भीतीचं सावट निर्माण केलं आहे. करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने जगाची चिंता वाढवली असून यानंतर अनेक देशांनी निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा हा नवा विषाणू सापडला असून तिथून येणाऱ्या वाहतुकीवर अनेकांनी बंदी घातली आहे. दरम्यान करोनाचा हा नवा विषाणू नेमका कसा आणि कुठे सापडला याबद्दल खुलासा झाला आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत दक्षिण अफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली असून आपल्याला धक्का बसल्याचं म्हटलं आहे.

नोव्हेंबर महिन्यात जेव्हा आपण नमुने पाहिले तेव्हाच याचा खूप मोठा परिणाम होणार असल्याची जाणीव झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. “मी जे पाहत होती ते पाहिल्यानंतर मला धक्काच बसला होता. प्रक्रियेत काही चूक तर नाही झाली ना असा प्रश्नही मी उपस्थित केला होता,” अशी माहिती रकेल वियाना यांनी दिली आहे. रकेल वियाना दक्षिण अफ्रिकेतील लॅन्सेट लॅबमध्ये कार्यरत आहेत. याआधीच्या विषाणूंच्या तुलनेत नमुन्यांमध्ये वेगळेपण आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ जोहान्सबर्गमध्ये असणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेलबल डिसीजला (NICD) यासंबंधी अलर्ट दिला. यानंतर त्यांनी २०-२१ नोव्हेंबरच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात चाचणी करण्यास सुरुवात केली. विषाणूचं उत्परिवर्तन पाहिल्यानंतर NICD च्या शास्त्रज्ञांनाही करोनाचा नवा विषाणू येत असल्याचं लक्षात आलं. गेल्या काही आठवड्यात वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता त्यांची याबाबत खात्री पटली होती.

२३ नोव्हेंबरला जोहान्सबर्ग आणि प्रिटोरियाच्या आसपास आणखी ३२ नमुन्यांची चाचणी केली असता हे स्पष्ट झालं अशी माहिती NICD च्या डॅनियल यांनी दिली आहे. हे खूप भीतीदायक होतं असंही ते म्हणाले आहेत. त्याचदिवशी NICD च्या टीमने आरोग्य विभाग आणि नमुन्यांची चाचणी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील इतर प्रयोगशाळांना याची माहिती दिली. यावेळी त्यांनीही हाच निष्कर्ष काढला. शास्त्रज्ञांनी ही माहिती GISAID ग्लोबल सायन्सच्या डेटाबेसमध्ये दिली. यावेळी बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्येही अशाच केसेस रिपोर्ट झाल्याची माहिती NICD ला मिळाली. गांभीर्य लक्षात घेत जागितक आरोग्य संघटनेला कळवण्यात आलं. काही दिवसांतच दक्षिण अफ्रिकेत ओमायक्रॉनने पसरण्यास सुरुवात केली. काही प्रांतामध्ये नव्या विषाणूचे रुग्ण आढळू लागले. ओमायक्रॉनने दक्षिण अफ्रिकेत भीतीचं वातावरण निर्माण केलं असून आठवड्याच्या शेवटी १० हजार रुग्ण होण्याची भीती आहे. दुसरीकडे शास्त्रज्ञ करोनाचा हा नवा विषाणू किती धोकादायक आहे तसंच लसींमुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीवरही परिणामकारक आहे का याची माहिती घेत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button