breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे”; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

मुंबई |

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता या व्हिडीओवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता नाना पटोले यांनी या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिले आहे. ते वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याबाबतीत नव्हते असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.

“जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे.

  • काय म्हणाले होते नाना पटोले ?

“मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्ष झालीय राजकारण करतोय पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे….,” असे नाना पटोले या व्हायरल व्हिडीओमध्ये बोलत असताना दिसत आहेत.

  • भाजपाकडून टीका…

“पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते,” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तर महात्मा गांधी ते राहुल गांधी अशी विक्रमी घसरण, पडझड फक्त केंद्रीय नेतृत्वापुरती कशी होईल सुमार नेतृत्वाचा मामला सर्वच पातळीवर उपलब्ध आहे, अशी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्या मतदार संघात विविध ठिकाणी सभा घेतल्या होत्या. संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेदरम्यान नाना पटोले यांनी मी मोदींना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केलं. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद पेटला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button