Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हुश्श.. नाशिककरांना यंदा पाणीकपात नाही!

प्रतिनिधी, नाशिक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणात मार्चअखेर मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्याने नाशिककरांची यंदा पाणीकपातीतून सुटका होणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा मुबलक साठा असून, महापालिकेचे तब्बल अडीच टीएमसी पाणी आरक्षण शिल्लक आहे. ते ३१ जुलैपर्यंत पुरणार आहे. हे पाणी आरक्षण उर्वरित १२६ दिवसांसाठी पुरेसे असल्याने नाशिककरांना यंदा पाणीकपातीचे संकट सोसावे लागणार नसल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला असल्यामुळे नाशिककरांना पाणीकपातीच्या संकटाची झळ सोसावी लागणार नसल्याचे चित्र धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्यावरून दिसत आहे. शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणसमूह व मुकणे धरण, तसेच काही प्रमाणात दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी पावसाळ्याचा कालावधी वगळता १५ ऑक्टोबर ते ३१ जुलै या दरम्यानच्या कालावधीसाठी नाशिककरांना पिण्याच्या पाण्याचे आरक्षण या धरणांतून केले जात असते. गेल्या वर्षी नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता, महापालिकेने गंगापूर धरणसमूहातून चार हजार दशलक्ष घनफूट, मुकणेतून १,५००, तर दारणा धरणातून १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पाणी आरक्षण बैठकीत महापालिकेची पाणी आरक्षणाची मागणी मंजूर करण्यात आली होती. जलसंपदा विभागाने या पाणीवाटपावर अद्याप शिक्कामोर्तब केले नसले तरी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार महापालिकेने पाणीवापर सुरू केला आहे. उपलब्ध आरक्षणानुसार २४७३.३४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक असून, ते ३१ जुलैअखेर पुरणार असल्याने नाशिककरांना यंदा मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.

सव्वातीन टीएमसी पाणी वापरले

पाणी आरक्षण मंजूर झाल्यापासून गेल्या १६४ दिवसांमध्ये महापालिकेने शहरवासीयांसाठी गंगापूर धरणसमूहातून २३८२.७७ दशलक्ष घनफूट, तर मुकणेतून ७४३.८९ दशलक्ष घनफूट अशाप्रकारे एकूण ३१२६.६६ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याचा वापर केला आहे. सद्य:स्थितीत गंगापूर धरणसमूहात महापालिकेचे १६१७.२३ दशलक्ष घनफूट, दारणेतील १०० दशलक्ष घनफूट, तर मुकणेतील ७५६.११ दशलक्ष घनफूट अशा प्रकारे एकूण २४७३.३४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button