देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे संपूर्ण निकाल संध्याकाळपर्यंत हाती येणार आहेत. मात्र त्याआधीच भाजपाने चार राज्यांमध्ये तर आपने पंजाबमध्ये बहुमत मिळवले आहे. पंजाबमध्ये सत्ता असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातही काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असून काँग्रेस बसपाच्याही मागे पडला आहे. या सर्व निकालांनंतर आता खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाच राज्यांतील काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. जनतेचा निर्णय आम्ही नम्रपणे स्वीकारतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यातून आम्ही शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. “जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा. जनादेश जिंकणाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्ही यातून शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू,” असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तर हा बदल काँग्रेसला धक्का देणारा आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. “पाच राज्यांतील निवडणुकांपैकी चार राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती पण आज तिथे अतिशय वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधला हा बदल भाजपासाठी अनुकूल नाही. हा बदल काँग्रेस पक्षाला धक्का देणारा आहे. आपने दिल्लीमध्ये दोनदा ज्या प्रकारे यश संपादन केले त्याबद्दली मान्यता दिल्लीकरांमध्ये आहे. दिल्लीतल्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये झाला हे स्पष्टपणे दिसत आहे. पंजाबसोडून बाकीच्या राज्यांमध्ये लोकांनी जे सत्तेमध्ये आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भाजपाचे राज्य पुन्हा प्रस्थापित झाले आहे,” असे शरद पवार यांनी म्हटले.