breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मानवाचा प्रवास कृत्रिम बुध्दीमत्तेबरोबरच अध्यात्मिक बुध्दीमत्तेकडे व्हावा…..राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पढेगा भारत जीओ टिव्ही चॅनलचे उद्‌घाटन

पिंपरी | प्रतिनिधी 
रोज वेगाने विकसित होणा-या तंत्रज्ञानामुळे मानवी बुध्दीमत्तेला आता कृत्रिम बुध्दीमत्तेची साथ मिळत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग भारतातील खेडोपाड्यात वेगाने आणि कमी खर्चात शिक्षण पोहचविण्यासाठी होणार आहे. मानवाचा प्रवास आता मानवी बुध्दीमत्तेकडून कृत्रिम बुध्दीमत्तेबरोबरच अध्यात्मिक बुध्दीमत्तेकडे व्हावा अशी अपेक्षा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘पढेगा भारत’ या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मचे जीओ टिव्ही चॅनलवर लॉचिंग शनिवारी (दि. 25 डिसेंबर) पिंपरीत करण्यात आले. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रिलायन्स इनोव्हेशन कौन्सिलचे चेअरमन डॉ. रघुनाथ माशेलकर, भारत सरकार एनसीडीएनटीचे चेअरमन दादा इदाते, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु डॉ. नितिन करमळकर, जीओचे दिपक शिवले, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, पढेगा भारतच्या चेअरमन वेणू अमर साबळे, संचालक सम्यक साबळे, ओमकार कस्पटे आदी उपस्थित होते.


यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, जीओच्या सहयोगाने ‘पढेगा भारत’ ची सुरुवात होणे हा आनंदाचा क्षण आहे. अणूस्फोटाचे तंत्रज्ञान विकसीत करुन वीस वर्षे पडून होते. परंतू तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे 1998 रोजी आंतरराष्ट्रीय दबाव झुगारुन अणूस्फोट केला. डॉ. माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली केलेला संकल्प तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सिध्दीस नेला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे एखादा संकल्प करुन प्रयत्नपूर्वक पुर्ण करतात. त्याचप्रमाणे वेणू साबळे यांनी सर्वदुर कमी खर्चात डिजीटल माध्यमातून शिक्षण पोहचविण्याचा केलेला पढेगा भारत जिओ टिव्ही हा संकल्प नक्कीच सिध्दीस जाईल. या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि माजी खासदार अमर साबळे यांचे मार्गदर्शन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने डिजीटल इंडियासाठी केलेल्या कामामुळे जग आता भारताकडे एक प्रेरणा म्हणून पहात आहे असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, दहा कोटी शेतक-यांना एकाच वेळी एका क्लिकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाच्या तंत्रज्ञानामुळे अनुदान दिले. शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य पढेगा भारतच्या माध्यमातून होणार आहे. यातून चांगली सुसंस्कारीत पिढी घडेल तसेच उद्योजक, डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक आणि जबाबदार नागरीक घडतील. या दृकश्राव्य माध्यमातून मिळणा-या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमताही वाढेल असेही डॉ. भागवत कराड म्हणाले.
रिलायन्स इनोव्हेशन कौन्सिलचे चेअरमन डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की, पढेगा भारत जीओ टिव्ही हि संकल्पना खेड्यापाड्यातील, गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत कमी खर्चात वेगाने विस्तारणारा, मोठी व्याप्ती असणारा प्रकल्प आहे. ‘राईट टू एज्युकेशन’ नंतर आता ‘राईट एज्युकेशन’ महत्वाचे आहे. ज्ञान संवर्धनासह व्यक्ती म्हणजेच गुरु संवर्धनही आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामुळे आत्मनिर्भर भारताबरोबर आता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास येऊ लागला आहे असे डॉ. माशेलकर म्हणाले.
भारत सरकार एनसीडीएनटीचे चेअरमन दादा इदाते म्हणाले की, भगवान गौतम बुध्द, महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा घेऊन ज्ञानदानाचा सुरु केलेला हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होईल अशा शुभेच्छा दादा इदाते यांनी दिल्या. कुलगुरु डॉ. नितिन करमळकर म्हणाले की, प्राथमिक शिक्षणासह उच्च शिक्षणापर्यंत अनेक शाखांचे, विविध भाषांमधून पढेगा भारत जीओ टिव्ही काम करणार आहे. अल्पावधीतच चाळीस चॅनेल पार्टनर यांच्याशी जोडले गेले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देखील त्यांचा एक भाग आहे. यातून मराठीसह इतरही भाषांमधील सर्व घटकांना बरोबर घेऊन पुढे जाता येईल. केवळ भाषेच्या अडचणीमुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही असा आशावाद डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक करताना पढेगा भारतच्या चेअरमन वेणू अमर साबळे म्हणाल्या की, टिव्ही, इंटरनेट हि मनोरंजनाची साधणे आता ज्ञानदानाचे काम करणार आहेत. देशातील 45 कोटी घरात जीओ पोहचले आहे. वन नेशन, वन क्लॉलिटी एज्युकेशन या सूत्राने पढेगा भारत जीओ टिव्ही काम करणार आहे. ‘पढेगा भारत’ ने नवीन शैक्षणिक धोरण आणि एसएससी बोर्डानुसार 5 वी ते 10 वीचा अभ्यासक्रम तसेच ‘सीबीएससी’चा 1 ते 12 वी पर्यंतचा अभ्यासक्रम ॲक्टीवीटी बेस आणि थ्रीडी ॲनिमेशन या आधुनिक डीजीटल तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार केला आहे. तो आता जीओ टिव्हीच्या 40 कोटी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. हा अभ्यासक्रम मराठी माध्यम, सेमी इंग्लिश, इंग्लिश, हिंदी व उर्दु माध्यमातून सुध्दा लवकरच उपलब्ध होणार आहे. पढेगा भारत ने सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉकचेन तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स इन फायनान्सशियल टेक्नॉलॉजी यासाठी देशातील 27 विद्यापीठांशी तसेच अन्य मान्यवर संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. नवीन शैक्षणिक धोरण, फिनलंडचे आदर्श आधुनिक शैक्षणिक मॉडेल, ॲक्टीव्हीटी बेस लर्निग, क्रिएटीव्हीटी, बहुपर्यायी प्रश्न पध्दती, मानस शास्त्रिय दृष्टीकोन आणि मुल्यमापन पध्दतीचा सुयोग्य वापर करुन चित्रमय पध्दतीने हा अभ्यासक्रम तयार केला आहे अशीही माहिती वेणू साबळे यांनी दिली.
स्वागत वेणू साबळे, सुत्रसंचालन प्रा. नाना शिवले आणि आभार माजी खासदार अमर साबळे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button